कुडाळ | प्रतिनिधी – कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी करण्यात आली. यामध्ये व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती जिल्हास्तरीय ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार कणकवली येथील संतोष वायंगणकर यांना, कै. वसंत दळवी स्मृती ग्रामीण वार्ताहर पुरस्कार माणगाव येथील भरत केसरकर यांना, तर व्याधकार ग. म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती जिल्हास्तरीय छायाचित्रकार पुरस्कार सावंतवाडी येथील जतीन भिसे यांना जाहीर करण्यात आला आहे.
कुडाळ तालुका पत्रकार समितीची बैठक नुकतीच तालुका अध्यक्ष विजय पालकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सर्वानुमते पुरस्कारार्थी निश्चित करण्यात आले. या पुरस्कारांचे वितरण शनिवार, दिनांक १६ फेब्रुवारी रोजी आयोजित समारंभात करण्यात येणार आहे.
या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व कुडाळचे सदस्य उमेश तोरसकर, तालुका सचिव विठ्ठल राणे, उपाध्यक्ष रवी गावडे, विलास कुडाळकर, तसेच निलेश तेंडुलकर, निलेश जोशी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजन नाईक, ज्येष्ठ पत्रकार चंदू सामंत, प्रमोद ठाकूर, प्रमोद म्हाडगूत, अजय सावंत, गुरु दळवी, अरुण अणावकर, काशीराम गायकवाड, प्रसाद राणे, भरत केसरकर, वैशाली खानोलकर आदी पत्रकार उपस्थित होते.
कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिले जाणारे हे पुरस्कार पत्रकारितेतील योगदानाची दखल घेणारे असून, यामुळे पत्रकारांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.






