कणकवलीत पार पडलेली खासदार नारायण राणेंची सभा ही केवळ कार्यकर्ता मेळावा नव्हता, तर तो सिंधुदुर्गच्या राजकारणाला दिशा देणारा स्पष्ट राजकीय संकेत होता. “राणेंना संपवणे शक्य नाही; राणे एक संघ आहेत” हा त्यांचा उद्गार जितका आत्मविश्वासपूर्ण होता, तितकाच तो अनेकांसाठी इशाराही होता. मात्र या सभेचा खरा प्रश्न असा आहे—हा स्पीकर नेमका कोणत्या दिशेला होता?
पहिली दिशा स्पष्टपणे कार्यकर्त्यांकडे होती. सभेचा सूर वारंवार निष्ठा, एकजूट आणि डगमगू नका या मुद्द्यांवर येत होता. “राणे विरुद्ध राणे होणार नाही”, “पक्ष वेगळे असले तरी राणे वेगळे होणार नाहीत” ही वाक्ये म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये पसरवली जाणारी संभ्रमाची, फूट पाडण्याची चर्चा थांबवण्याचा थेट प्रयत्न होता. ही सभा कार्यकर्त्यांना मानसिक बळ देणारी, त्यांना पुन्हा एकदा एका छताखाली गोळा करणारी होती.
दुसरी दिशा होती विरोधकांकडे. “माझ्या रस्त्यात आलात तर थारा देणार नाही” हा इशारा केवळ भाषणाचा आवेश नव्हता, तर सिंधुदुर्गच्या राजकारणात ‘नवे नेतृत्व उभं राहतंय’ असा दावा करणाऱ्यांना दिलेला ठाम संदेश होता. राणेंनी आपल्या कामांची यादी मांडत—धरणे, रस्ते, पाणीटंचाईवर मात—एक प्रकारे आव्हानच दिलं : काम दाखवा, केवळ बोलू नका.
तिसरी आणि अधिक सूक्ष्म दिशा होती महायुतीतील अंतर्गत राजकारणाकडे. महायुती एकत्र राहावी, भांडण-लावालावी टाळावी, मतभेद फितुरीत बदलू नयेत—हे आवाहन सांगून जातं की सध्या आतून कुरबुरी आहेत, आणि त्या वाढू नयेत यासाठीच हा मेळावा होता. “पैशाने माणसं मिळवता येत नाहीत” हा उल्लेख, कोटी कोटींच्या ऑफरच्या आरोपांसह, हा इशारा थेट त्या प्रवृत्तींना होता ज्या राजकारणात निष्ठेपेक्षा नोटा महत्त्वाच्या मानतात.
चौथी दिशा होती भविष्याकडे. निलेश–नितेश राणेंचा वारंवार उल्लेख, “माझ्यानंतर ते तुम्हाला साथ देतील” हा संदेश, म्हणजे नेतृत्व हस्तांतरणाची जाहीर घोषणा नाही; पण नेतृत्वाची सलगता अधोरेखित करणारा स्पष्ट संकेत आहे. राणेंनी स्वतःला सेवक म्हणत, पण मागे मजबूत कुटुंबीय नेतृत्व उभं असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना दिला.
या सगळ्यातून सभेचा स्पीकर एकाच दिशेला होता म्हणून कुणा एका दिशेकडे पाहून चालणार नाही. त्यांचा आवाज म्हणजे सिंधुदुर्गचा आसमंत आहे…आज तिन्ही बाजूनी जमलेल्या त्यांच्या समर्थकांचा अढळ धिराचा बुलंद आवाज होता— ‘कार्यकर्त्यांना धीर देणारा, विरोधकांना इशारा देणारा, आणि महायुतीला शिस्तीचा सल्ला देणारा’…
मात्र अंतिम दिशा होती जनतेकडे. “मला पद नको, जनता हवी” हा वारंवार येणारा सूर, “मी साहेब नाही, सेवक आहे” हे विधान, ही सभा सत्तेच्या गर्जनेपेक्षा जनसमर्थनावर उभी असल्याचं दाखवते. कणकवलीची सभा म्हणजे एका वाक्यात मान्य करायचे तर
सिंधुदुर्गच्या राजकारणात आवाज अजूनही राणेंचाच आहे. आणि लोकांनाही फक्त तोच एक आवाज कळतो !





