मालवण (प्रतिनिधी):
पर्यटन शहर म्हणून ओळख असलेल्या मालवणमध्ये कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मालवण नगरपालिकेच्या आडारी येथील कचरा डम्पिंग ग्राउंडला उबाठा शिवसेनेच्या नगरसेवकांनी अचानक भेट देत पाहणी केली असता, प्रशासन व संबंधित ठेकेदारांच्या कथित मिलीभगतीचा गंभीर प्रकार उघडकीस आला. यामुळे शहरातील कचरा समस्या अधिकच गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
डम्पिंग ग्राउंडवरील कचरा श्रेडींग मशीन बंद अवस्थेत, कंपोस्ट खत निर्मिती पूर्णपणे ठप्प आणि कामगारांची अपुरी उपस्थिती — या सर्व बाबींमुळे कचरा व्यवस्थापनासाठी खर्च होणारे लाखो रुपये अक्षरशः मातीमोल होत असल्याचा आरोप उबाठा शिवसेनेचे नगरसेवक मंदार ओरसकर यांनी केला. इतकेच नव्हे, तर कागदोपत्री शंभर टक्के हजेरी दाखवली जात असताना प्रत्यक्षात मोजकेच कामगार काम करत असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले.
याच पार्श्वभूमीवर आज उबाठा शिवसेनेचे नगरसेवक मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत व तपस्वी मयेकर यांनी डम्पिंग ग्राउंडला भेट देत सखोल पाहणी केली. यावेळी बंड्या सरमळकर, दत्ता पोईपकर, बबन वाघ, रोशन कांबळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

श्रेडींग मशीन बंद, खतनिर्मिती ठप्प!
पाहणीदरम्यान कचरा बारीक करण्यासाठी असलेल्या दोन्ही श्रेडींग मशीन अनेक दिवसांपासून बंद असल्याचे आढळून आले. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याची प्रक्रिया गेल्या सहा-सात महिन्यांपासून पूर्णतः बंद असून, गोळा करून ठेवलेल्या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याचे दिसून आले.
हजेरी कागदावर, काम मात्र गायब
डम्पिंग ग्राउंडसाठी १६ कामगार निश्चित असताना प्रत्यक्ष पाहणीवेळी केवळ पाच ते सहा कामगारच कार्यरत होते. मात्र, हजेरी बुकात महिन्याचे सर्व दिवस सर्व कामगार उपस्थित असल्याची नोंद असल्याने बनावट हजेरीचा गंभीर संशय नगरसेवकांनी व्यक्त केला.
‘प्रशासन–ठेकेदार संगनमताचा संशय’
“श्रेडींग मशीनवर लाखो रुपये खर्च झाले, पण काही दिवसांतच त्या बंद पडल्या. खतनिर्मिती थांबली आहे. कागदोपत्री हजेरी दाखवून प्रत्यक्षात कामच होत नाही. या ठेकेदाराच्या कामावर प्रशासनाचा कोणताही वचक नाही. प्रशासन व ठेकेदार यांची मिलीभगत असल्याशिवाय हे शक्य नाही,” असा थेट आरोप नगरसेवक मंदार ओरसकर यांनी केला.
कचरा प्रश्न पेटणार?
पर्यटन शहर असलेल्या मालवणमध्ये कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात कचऱ्याचा प्रश्न आणखी गंभीर बनणार असल्याचा इशारा उबाठा शिवसेनेने दिला आहे. येत्या वर्षभरात मालवण शहर कचरा मुक्त व प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करू, तसेच कोणत्याही वेळी डम्पिंग ग्राउंडला भेट देऊन पाहणी करू, असेही ओरसकर यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व नागरिकांनी या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, अन्यथा मालवणच्या सौंदर्यावर कचऱ्याचा डाग अधिक गडद होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.





