सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सध्या शांततेच्या पृष्ठभागाखाली प्रचंड हालचाली सुरू आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांच्या प्रचारकाळात जे वितुष्ट, जे आरोप–प्रत्यारोप रंगले, ते निकालानंतरही संपलेले नाहीत; उलट ते आता अधिक निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहेत. राजकीय संघर्षाची दिशा बदलणाऱ्या घडामोडी जिल्ह्यात आकार घेत असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.
आज जिल्ह्यातील एका बड्या सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या निवासस्थानी सर्व ‘शिष्यांची’ एक महत्त्वाची बैठक पार पडत आहे. ही बैठक केवळ औपचारिक नसून, आगामी राजकीय रणनीतींचे सूत्र ठरवणारी ठरणार असल्याचे संकेत आहेत. विशेष म्हणजे या बैठकीत जिल्हा राजकारणातील दिग्गज चेहरे सहभागी होत असून, बैठक स्थळाभोवती सुरू असलेल्या नियोजनात्मक हालचालीच पुढील काही तासांत नवी ब्रेकिंग न्यूज देण्याची शक्यता निर्माण करत आहेत.
राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेली आणखी एक बाब म्हणजे येत्या दोन दिवसांत होणारे भव्य शक्तिप्रदर्शन. हे शक्तिप्रदर्शन केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता, मुंबई महापालिका निवडणुकांवरही थेट प्रभाव टाकणारे ठरेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील ही घडामोड राज्याच्या राजकारणात दूरगामी परिणाम घडवू शकते.
दरम्यान, जिल्ह्यातील एका नगरपालिकेत बडे पक्ष शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत का बसले, यामागील राजकीय अर्थ आता हळूहळू उलगडू लागला आहे. वरकरणी विकासाचे गणित मांडले गेले असले, तरी त्यामागे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे आणि त्याही पुढे राज्यस्तरीय राजकारणाचे सखोल गणित दडलेले आहे. स्थानिक सत्ता, निधीचे नियंत्रण आणि संघटनात्मक बांधणी यांचा हा खेळ अधिक तीव्र होताना दिसत आहे.
या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत थेट सत्तासूत्रधार. जिल्ह्याच्या राजकारणावर असलेली त्यांची पकड पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. जिल्हा परिषद निवडणूक निकालाच्या आधीच हेवीवेट राजकारणाचा नवा अध्याय सुरू झाला असून, मित्र–शत्रूंची नव्याने मांडणी होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
एकूणच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण आता केवळ स्थानिक प्रश्नांपुरते मर्यादित राहिलेले नाही. ते राज्य आणि महानगरपालिका निवडणुकांशी थेट जोडले गेले आहे. येत्या काही दिवसांत घडणाऱ्या हालचाली जिल्ह्याच्या राजकीय दिशादर्शक ठरणार असून, सत्तेच्या पटावर नवी समीकरणे आकार घेणार, एवढे मात्र निश्चित.






