सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाकडून देण्यात येणारा मानाचा “उत्कृष्ट पत्रकार” पुरस्कार ‘HELLO सिंधुदुर्ग’ डिजिटल न्यूज चॅनेलचे संपादक सागर दत्ताराम चव्हाण यांना जाहीर झाला आहे. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली.
दरम्यान, जिल्हा पत्रकार संघाच्या बैठकीत यंदा देवगड, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सिंधुदुर्गनगरी, दोडामार्ग व वैभववाडी तालुक्यांतील एकूण नऊ पत्रकारांची उत्कृष्ट पत्रकार म्हणून निवड करण्यात आली आहे. देवगड तालुक्यातील अयोध्याप्रसाद गावकर, कणकवलीतील सुधीर राणे, मालवण येथील अर्जुन बापर्डेकर, कुडाळ तालुक्यातील प्रशांत पोईपकर, वेंगुर्ला येथील प्रदीप सावंत, सिंधुदुर्गनगरीतील लवू महाडेश्वर, दोडामार्ग येथील ओम देसाई, वैभववाडीतून महेश रावराणे या ९ जणांची यावर्षीचे उत्कृष्ट पत्रकार म्हणून जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकरिणीच्या बैठकीत निवड करण्यात आली.
या सर्व पुरस्कारप्राप्त पत्रकारांचा ६ जानेवारी रोजी ‘पत्रकार दिना’निमित्त सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रसन्ना जोशी यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले असून पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आम. दीपक केसरकर, आम. निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.





