सिंधुदुर्ग, दि. ७ : प्रतिनिधी
हिंदी पत्रकारितेचे पितामह, संपादकाचार्य बाबुराव विष्णू पराडकर यांच्या स्मारकासाठी जागेची स्थळपाहणी करून मोजणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. ग्रामस्थांशी विचारविनिमय करून सुचविण्यात आलेल्या पर्यायी जागांची पाहणी करावी आणि त्यापैकी योग्य जागा अंतिम करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्मारकाच्या कामांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. स्मारकासाठी जागा निश्चिती, मोजणी, तज्ज्ञांची नेमणूक आणि पुढील प्रशासकीय कार्यवाही याबाबत बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. स्मारकाच्या कामातील आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करून प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, बांधकाम व वित्त सभापती संतोष साटविलकर, काशी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा. राममोहन पाठक, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, कार्यकारी अभियंता डी. बी. बागुल, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत, नगररचना विभागाचे सहायक संचालक रवींद्र बनसोड तसेच संबंधित ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
पराड येथे स्मारक उभारण्याचा शासनाचा प्रस्ताव
संपादकाचार्य बाबुराव विष्णू पराडकर यांचे स्मारक मालवण तालुक्यातील मौजे पराड या त्यांच्या वडिलांच्या मूळ गावी उभारण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव आहे. या स्मारकास शासनाने यापूर्वीच तत्त्वतः मंजुरी दिली आहे. स्मारकासाठी योग्य जागा निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे.
नोव्हेंबर २०२५ मध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनीही योग्य जागेची निवड करून स्मारकाच्या पुढील कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश दिले होते.
हिंदी पत्रकारितेत अमूल्य योगदान
बाबुराव विष्णू पराडकर यांचे वडील काशी येथे स्थायिक झाले होते. बाबुरावांचा जन्म काशीत झाला असला तरी मराठी मुळांशी जोडलेल्या या सुपुत्राने हिंदी पत्रकारितेत अद्वितीय आणि अमूल्य योगदान दिले. हिंदी पत्रकारितेच्या विकासात त्यांचे मोठे योगदान असून, त्यांनी हिंदीमध्ये ३०० हून अधिक नवीन पारिभाषिक शब्द रूढ केले, अशी माहिती काशी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा. राममोहन पाठक यांनी बैठकीत दिली.
पराडकर यांच्या स्मारकामुळे त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाचे स्मरण पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्याबरोबरच मालवण आणि सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्राच्या इतिहासाला महत्त्वाचे स्मारक प्राप्त होणार आहे.






