आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून जनसुविधा व नागरी सुविधांच्या कामांना गती
मालवण, दि. ७ : प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील विविध गावांमध्ये मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी जनसुविधा व नागरी सुविधांच्या माध्यमातून सुमारे ३ कोटी ५९ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. या निधीतून तालुक्यातील विविध प्रलंबित कामांना गती मिळणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक असलेल्या नागरी सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
मालवण तालुक्यातील विविध गावांमधून सार्वजनिक सुविधा आणि नागरी कामांसंदर्भात स्थानिक पातळीवर मागण्या करण्यात आल्या होत्या. शिवसेना शाखाप्रमुख, विभागप्रमुख, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या कामांचा पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर या कामांना मंजुरी मिळाली आहे.
या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायण राणे, आमदार नीलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे आणि विनायक बाईत यांनी आभार मानले आहेत.
विकासकामांना मंजुरी मिळवून देताना आमदार नीलेश राणे यांनी विशेष लक्ष दिल्याचे तालुकाप्रमुख मंदार लुडबे व विनायक बाईत यांनी सांगितले. त्यांच्या माध्यमातून जनसुविधा व नागरी सुविधांच्या योजनेंतर्गत विविध कामांना मंजुरी मिळाल्याने तालुक्यातील अनेक गावांमधील प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत.
या निधीतून होणाऱ्या कामांमुळे ग्रामीण भागातील सार्वजनिक सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
मालवण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून सातत्याने निधी उपलब्ध होत आहे. यापुढेही तालुक्यातील आवश्यक विकासकामांचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मंदार लुडबे व विनायक बाईत यांनी सांगितले.






