सिंधुदुर्गनगरी, दि. ३१ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकरी खातेदारांनी आपल्या शेतातील खरीप हंगामातील पिकांची अचूक नोंदणी गावातील नियुक्त पीक पाहणी सहाय्यकांमार्फत ‘डीसीएस एमएच’ (Digital Crop Survey Maharashtra) या मोबाईल ॲपद्वारे १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
खरीप हंगाम २०२६ साठी महसूल विभागाच्या वतीने ‘डीसीएस एमएच’ मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी अर्थात डिजिटल क्रॉप सर्व्हेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाईल ॲपद्वारे राज्यात ११ ऑगस्ट २०२६पासून पीक पाहणीचे काम सुरू करण्यात आले आहे. पीक पाहणीच्या अनुषंगाने नियुक्त सहाय्यकांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करूनच त्यांची छायाचित्रे ॲपवर अपलोड करावीत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
ई-पीक पाहणीची अचूक नोंदणी झाल्यास शेतकऱ्यांना पीक विमा, पीक कर्ज तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मिळणारी शासकीय मदत आणि नुकसानभरपाई मिळणे सुलभ होते. तसेच, शासकीय आधारभूत किमतीने (एमएसपी) शेतीमालाची विक्री करण्यासाठीही ई-पीक पाहणीची नोंद अत्यंत महत्त्वाची आहे.
शेतात प्रत्यक्ष उपस्थित राहून मोबाईल ॲपद्वारे पिकांचे छायाचित्र अपलोड केल्यामुळे सातबारा उताऱ्यावर पिकांची अचूक आणि पारदर्शक नोंद होण्यास मदत होते. त्यामुळे विविध शासकीय योजना आणि कृषीविषयक सुविधांचा लाभ घेताना ही नोंद उपयुक्त ठरते.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या गावातील नियुक्त पीक पाहणी सहाय्यकांशी संपर्क साधून विहित मुदतीत भात, नागली तसेच अन्य खरीप पिकांची अचूक नोंदणी करून घ्यावी. पीक पाहणीच्या प्रक्रियेत काही अडचणी उद्भवल्यास संबंधित तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






