सिंधुदुर्ग, दि. १ : देवगड, मालवण, रेडी आणि बांदा या चार प्रभाव क्षेत्रांतील विकास परवानगीच्या प्रस्तावांना गती देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरंगी सभागृहात दोन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १ आणि २ सप्टेंबर २०२६ रोजी घेण्यात येत असून, विकासविषयक प्रस्ताव सादर करताना अर्जदार, वास्तुविशारद आणि विकासकांना येणाऱ्या विविध अडचणींचे प्राधान्याने निराकरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील देवगड, मालवण, रेडी आणि बांदा या चार प्रभाव क्षेत्रांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रभाव क्षेत्रांमध्ये विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या आणि प्रस्तावांच्या प्रक्रियेत अर्जदारांना विविध प्रशासकीय व तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर विकास परवानगीचे प्रस्ताव जलदगतीने निकाली काढण्याच्या उद्देशाने हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात संबंधित अर्जदार, वास्तुविशारद तसेच विकासकांना आपल्या प्रस्तावांशी संबंधित अडचणी थेट मांडता येणार आहेत. प्राप्त झालेल्या अडचणींची संबंधित यंत्रणांकडून तपासणी करून त्यांचे प्राधान्याने निराकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
प्रभाव क्षेत्रातील विकासकामांना आवश्यक त्या नियोजनबद्ध परवानग्या वेळेत मिळाल्यास स्थानिक पातळीवरील विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिक, बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद आणि विकासकांसाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
विकास परवानगी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करून प्रस्तावांची कार्यवाही अधिक गतिमान, सुलभ आणि प्रभावी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून केला जात आहे.






