महिला गटात संजना मेस्त्री उपविजेत्या; पुरुष गटात दीप केरकर द्वितीय
मालवण (प्रतिनिधी) :
मालवण राजकोट येथे राजकोट बॉईज आणि राजकोट मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य महिला व पुरुष गटातील नारळ लढविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर आणि युवा उद्योजक सोनू खांदारे यांच्या पुरस्करातून झालेल्या या स्पर्धेत महिला गटात अक्षता आचरेकर, तर पुरुष गटात पंकज सादये यांनी विजेतेपद पटकावले.
राजकोट किल्ला येथे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्य तथा युवासेना नेत्या अपूर्वा किरण सामंत यांच्या हस्ते, शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेच्या भव्य आयोजनाचे कौतुक करताना आयोजक राजकोट बॉईज आणि राजकोट मित्रमंडळाचे मान्यवरांनी अभिनंदन केले. आमदार नीलेश राणे आणि आमदार किरण सामंत यांच्या सामाजिक कार्याचाही यावेळी गौरव करण्यात आला.
अक्षता आचरेकर यांचे महिला गटात विजेतेपद
महिला गटात अक्षता आचरेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. संजना मेस्त्री यांनी द्वितीय, तर धनश्री लाड यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना सोन्याची नथ, मिक्सर आणि मानाची पैठणी, द्वितीय क्रमांकासाठी फ्रिज आणि पैठणी, तर तृतीय क्रमांकासाठी वॉशिंग मशीन आणि पैठणी अशी आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
पंकज सादये यांचा पुरुष गटात दमदार विजय
पुरुषांच्या खेळी नारळ फोडणे स्पर्धेत पंकज सादये विजेते ठरले. दीप केरकर यांनी द्वितीय, अनिकेत जांभळे यांनी तृतीय, तर रुद्र राऊळ यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला.
विजेत्या पंकज सादये यांना ५५ हजार ५५५ रुपये रोख आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला २५ हजार ५५५ रुपये आणि चषक, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी ५ हजार ५५५ रुपये आणि आकर्षक चषक देण्यात आला. याशिवाय विविध आकर्षक बक्षिसांनी स्पर्धकांचा गौरव करण्यात आला.
स्पर्धेला उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, युवा उद्योजक सोनू खांदारे, सुनील खांदारे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, शहर संघटक राजू बिडये, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, राजकोट बॉईज व राजकोट मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.
महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, गीता बापर्डेकर, गौरी खांदारे, रूपा बिडये, अनिता फर्नांडिस, मंदा जोशी, नगरसेविका महानंदा खानोलकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. स्पर्धेला महिला भगिनींचीही लक्षणीय उपस्थिती लाभली.
नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक उत्सवाला या स्पर्धेमुळे विशेष रंगत आली. चुरशीच्या लढती, स्पर्धकांचा उत्साह आणि उपस्थितांचा जल्लोष यामुळे राजकोट परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.







