अंतिम सामन्यात पंकज सादये यांना नमवत पटकावला प्रथम क्रमांक; २४ संघांचा सहभाग
मालवण, दि. २८ : प्रतिनिधी
मालवण येथील सतीश आचरेकर मित्रमंडळाच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि मानाच्या राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेत अलिबागच्या शैलेश नाईक यांनी बाजी मारली. अंतिम सामन्यात पंकज सादये यांना नमवत शैलेश नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, खारेपाटण, गोवा आणि सिंधुदुर्ग येथून तब्बल २४ संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेचे उद्घाटन कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सतीश आचरेकर यांच्या हस्ते आमदार नीलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, अशोक सावंत, संदीप परब, पंकज सादये आणि बबन शिंदे यांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार नीलेश राणे यांनी स्पर्धेला शुभेच्छा देत ही स्पर्धा दरवर्षी अधिक मोठ्या स्वरूपात आयोजित करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
१ लाख १ हजार १११ रुपयांचे प्रथम पारितोषिक
२४ संघांना दोन गटांत विभागून सामने खेळविण्यात आले. दोन्ही गटांतील सामने अत्यंत रोमहर्षक आणि अटीतटीचे झाले. संपूर्ण स्पर्धेत अलिबाग येथील शैलेश नाईक यांनी आपल्या खेळाचे एकहाती वर्चस्व राखत अंतिम फेरीतही दमदार कामगिरी केली.
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शैलेश नाईक यांना १ लाख १ हजार १११ रुपये रोख आणि आकर्षक चषक देण्यात आला. आसिफ विकी यांनी द्वितीय क्रमांक मिळवत ५१ हजार १११ रुपये आणि चषक पटकावला. पंकज सादये यांनी तृतीय क्रमांक मिळवत २१ हजार १११ रुपये आणि चषक, तर मनोज मयेकर यांच्या संघाने चतुर्थ क्रमांक मिळवत ११ हजार १११ रुपये आणि चषक पटकावला.
याशिवाय अलिबाग येथील वर्धान घरत यांना उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ म्हणून आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. गोवा येथील डॉमनिक (पंकज सादये) यांना उत्कृष्ट प्रहारासाठी, तर खारेपाटण येथील तुषार कोळसुलकर यांना आकर्षक नारळासाठी विशेष भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
‘ही राजकीय कार्यक्रमाची नव्हे, हौसेची सुरुवात’
यावेळी सतीश आचरेकर यांनी या स्पर्धेमागची भूमिका स्पष्ट केली. राजकीय क्षेत्रात सहभाग घेण्यासाठी कोणताही कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश नसून लहानपणापासून असलेली नारळ खेळण्याची हौस मोठी व्हावी, या भावनेतून ही स्पर्धा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी मित्रमंडळींनी एकत्र येऊन आनंद लुटावा, या उद्देशातून स्पर्धेची संकल्पना पुढे आली. आज मालवणवासीयही या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. यंदा तुल्यबळ संघ सहभागी झाल्याने स्पर्धेची रंगत अधिक वाढल्याचेही त्यांनी सांगितले.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी आनंद आचरेकर, तुषार मसुरकर, नीलेश वेर्णेकर आणि मॉन्टी नार्वेकर यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी नीलेश वेर्णेकर, संजय घरत, सागर तिगडी, आनंद आचरेकर, मोहन आचरेकर, वैभव मयेकर, मॉन्टी नार्वेकर, मनोज मयेकर, निशाद हिरनाईक, मोहन घरत, बाबा जोशी, विकी चोपडेकर, आशिष नार्वेकर, संजय सारंग, विपुल राऊळ, शैलेश नाईक, मोहन म्हात्रे, शंकर अण्णा घरत, गुणेश हडकर, दीप नार्वेकर, तुषार नार्वेकर, विराज पिळणकर, पप्या कीर, मानस कीर, संकेत हळदणकर आदींचा रॉयल ब्रदर्स मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मंडळाचे कार्यकर्ते दर्पण सादये, कुलराज बांदेकर, रॉनी फर्नांडिस, राज जाधव, हर्ष मिठबावकर, ओंकार यादव, सचिन साळगावकर, कुणाल मालवणकर, भूषण पडवळ, यज्ञेश करंजेकर, कल्पेश मसुरकर, मंदार अंधारी, मिथील हिंदळेकर, रेगन नहोना, भावेश पारकर, फ्रान्सिस नहोना, वेदांत मालवणकर, मॉरीस फर्नांडिस आणि योगेश मेस्त्री उपस्थित होते.
स्पर्धेचे समालोचन सातारा येथील श्रावणी पाटील आणि मालवण येथील अक्षय मालवणकर यांनी केले.
नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक उत्सवाला राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेची जोड मिळाल्याने मालवण बंदर जेटीवर दिवसभर उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.






