मालवण (प्रतिनिधी) : गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा सर्वसाधारण सभेत जिल्हाध्यक्षपदी चंद्रशेखर उपरकर यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी हरिश्चंद्र खोबरेकर, तर सरचिटणीसपदी महेंद्र पराडकर यांची निवड करण्यात आली.
मालवण येथील गाबीत समाज नागरी सहकारी पतसंस्था सभागृहात झालेल्या या बैठकीत नूतन विश्वस्त मंडळ, पदाधिकारी व कार्यकारी मंडळाची निवड जाहीर करण्यात आली. १७ सदस्यीय पदाधिकारी मंडळात सहचिटणीसपदी मेघनाद धुरी व पूजा सरकारे, खजिनदारपदी पांडुरंग कोचरेकर, तर हिशोब तपासनीसपदी दीपक तारी यांची निवड करण्यात आली.
कार्यकारी मंडळाचे विश्वस्त सदस्य म्हणून डॉ. प्रमोद कोळंबकर, शंकर ऊर्फ दादा वाघ, संजय बांदेकर, स्नेहा केरकर, सेजल परब, पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी, संजय केळुस्कर, मिथुन मालंडकर आणि नरेश हुले यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर मालवण नगरपालिकेचे बांधकाम सभापती तथा नगरसेवक सहदेव बापर्डेकर आणि उपाध्यक्ष संजय पराडकर यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवगड तालुका सरचिटणीस लक्ष्मण तारी, बाळा मुणगेकर, रमेश तारी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी देवगड तालुका गाबीत संघटनेचे अध्यक्ष संजय पराडकर यांनी चंद्रशेखर उपरकर यांच्या कार्याचे कौतुक केले. गेल्या तीन वर्षांत जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी गाबीत समाजासाठी सातत्याने केलेल्या कार्याची प्रशंसा करताना, यापूर्वीही सुमारे २५ वर्षे जिल्हा संघटक म्हणून त्यांनी समाजासाठी भरीव योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले.
गाबीत समाजाचा प्रमुख व्यवसाय मच्छिमारी व पर्यटनाशी संबंधित आहे. पर्यटन संस्था, रापण मच्छिमार संघटना, महिला मच्छिमार संघटना, सांस्कृतिक कार्यक्रम, शिबिरे, मेळावे, विविध आंदोलने, मोर्चे तसेच गाबीत महोत्सवाच्या माध्यमातून समाजाच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याचे काम उपरकर यांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य समाजासाठी मोलाचे ठरत असल्याचे पराडकर यांनी सांगितले.
फेरनिवडीनंतर बोलताना जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी आगामी गणेश चतुर्थीनंतर जिल्हा कार्यकारी मंडळासह गाबीत समाजाची वस्ती असलेल्या किनारपट्टी भागातील तसेच अन्य गावांमध्ये संपर्क दौरा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. या दौऱ्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांशी संवाद साधून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेवटी सरचिटणीस महेंद्र पराडकर यांनी आभार मानले.






