विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी
मालवण (प्रतिनिधी)
मालवण मेढा येथील श्री देव मुरलीधर मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक व भक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दि. २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा होणार आहे. दि. २८ रोजी रात्री ८ वाजता श्री देव ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ, वरची देवली यांचे भजन होणार असून बुवा महेश नाईक आणि पखवाज बंटी कांदळगावकर सहभागी होणार आहेत. दि. २९ रोजी श्री देव शंकर मंदिर, मेढा येथील महिला वारकरी दिंडी भजन मंडळाचे भजन होईल.
दि. ३० ऑगस्ट रोजी राम कृष्ण हरी संगीत संस्कार गुरुकुल, तेंडोली शाखा मालवण यांच्यातर्फे ‘प्रभूरंग’ कार्यक्रम, तर दि. ३१ रोजी घुमडाई प्रासादिक भजन मंडळ, घुमडे यांचे भजन आयोजित करण्यात आले आहे. दि. १ सप्टेंबर रोजी अष्टपैलू कलानिकेतन प्रस्तुत भक्तीरंग गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दि. २ रोजी वैभव मांजरेकर प्रस्तुत ‘भक्ती श्रावण’ कार्यक्रम होईल. यामध्ये संगीत अलंकार प्रफुल्ल रेवंडकर व महेंद्र मराठे गायन सादर करणार आहेत. दि. ३ रोजी ह.भ.प. कुमारी वेदिका परशुराम लुडबे हिचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुख्य दिवशी, दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता ह.भ.प. श्री दर्शन महेश वझे यांचे सुश्राव्य कीर्तन होईल. कृष्णजन्मानंतर रात्री १२.३० वाजता श्री मुरलीधर मंदिर ते राम मंदिर असा पालखी सोहळा पार पडणार आहे.
दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता दहीहंडी (दहीकाला) कार्यक्रम होणार असून त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मालवण बाजारपेठ मार्गे मौनिनाथ मंदिर, मेढा असा पालखी सोहळा होणार आहे.
या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव मुरलीधर मंदिर बालगोपाळ मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.






