कुणकवळे येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे चौथे पुष्प संपन्न
मालवण, दि. १६ : भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाही भारताची घटनात्मक रचना करण्यात निर्णायक योगदान दिले. त्यामुळे स्वतंत्र भारताच्या लोकशाहीची पायाभरणी करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन बार्टीचे समतादूत तथा भारतीय बौद्ध महासभेच्या प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष संग्राम कासले यांनी केले.
कुणकवळे येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण, महिला शाखा आणि संस्कार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिका २०२६चे चौथे पुष्प गुंफण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून संग्राम कासले बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर भाष्य करताना कासले म्हणाले की, केवळ ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळणे पुरेसे नाही, तर अस्पृश्यता, जातिभेद आणि सामाजिक विषमता नष्ट होऊन सर्व भारतीयांना समान अधिकार मिळणे आवश्यक आहे, असा बाबासाहेबांचा ठाम विचार होता. शोषित आणि वंचित समाजाला शिक्षण, प्रतिनिधित्व, रोजगार तसेच राजकीय अधिकार मिळावेत यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला.
बाबासाहेबांनी ब्रिटिशांच्या आर्थिक आणि प्रशासकीय धोरणांवरही टीका केली. भारतीयांच्या हिताचा विचार करून शासनव्यवस्थेत मूलभूत सुधारणा करण्याची त्यांनी मागणी केली. सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठी कायदा, संविधान आणि लोकशाही संस्थांचा मार्ग त्यांनी स्वीकारला. त्यांच्या विचारांमुळे भारतीय लोकशाहीला सामाजिक न्यायाची मजबूत अधिष्ठाने प्राप्त झाली, असेही कासले यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे मालवण तालुकाध्यक्ष रविकांत कदम, तालुका सरचिटणीस नचिकेत पवार, कार्यालयीन सचिव शंकर कदम, संरक्षण उपाध्यक्ष योगेश वराडकर, संस्कार सचिव मिलिंद पवार, सचिन कासले, प्रचार व पर्यटन सचिव संदीप कदम, तालुका महिला संघटक सानिका कदम, कुणकवळे गावशाखा उपाध्यक्ष चंद्रकांत कदम, महिला शाखा अध्यक्ष निशा कदम, कोषाध्यक्ष सायली कदम, सचिव संघमित्रा कदम यांच्यासह गौतम कदम, हेमंत कदम, गाव शाखेचे पदाधिकारी, उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नचिकेत पवार आणि योगेश वराडकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. तालुकाध्यक्ष रविकांत कदम यांनीही आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार विभाग सचिव सचिन कासले यांनी केले. संस्कार सचिव मिलिंद पवार यांनी आभार मानले. गाव शाखेच्या वतीने संदीप कदम यांनीही उपस्थितांचे आभार व्यक्त केले.






