कणकवली, प्रतिनिधी : समाज साहित्य प्रतिष्ठान-सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार-कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री मनीषा पाटील लिखित आणि रावा प्रकाशन प्रकाशित ‘काहूर’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ कादंबरीकार व कवयित्री उषा परब, नामवंत कवी व प्रसिद्ध स्तंभलेखक अजय कांडर तसेच समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला डॉ. धनश्री तायशेटे सावंत, अध्यक्ष, कणकवली शिक्षण संस्था; डॉ. संदीप सावंत, चेअरमन, कणकवली शिक्षण संस्था; डॉ. एस. एन. तायशेटे, चेअरमन, शालेय समिती; डी. एम. नलावडे, सचिव; एम. ए. काणेकर, उपकार्याध्यक्ष आणि जी. एन. बोडके, प्राचार्य, एस. एम. ज्युनिअर कॉलेज, कणकवली यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
समाज साहित्य प्रतिष्ठान-सिंधुदुर्गच्या उपाध्यक्ष म्हणून कोकणातील साहित्य चळवळीत योगदान देणाऱ्या तसेच गेल्या अनेक वर्षांपासून काव्यलेखन करणाऱ्या कवयित्री मनीषा पाटील यांच्या ‘काहूर’ या दुसऱ्या कवितासंग्रहाचे प्रकाशन या सोहळ्यात होणार आहे.
या साहित्यिक कार्यक्रमाला साहित्यरसिक, वाचक आणि कविता प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाज साहित्य प्रतिष्ठान आणि मिळून साऱ्याजणी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.






