१८ ऑगस्ट रोजी ‘नशामुक्त मित्र’ म्हणून नोंदणी करून ई-शपथ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि. १३ (जिमाका) : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या ‘नशामुक्त भारत अभियान’ या राष्ट्रव्यापी उपक्रमाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त १८ ऑगस्ट २०२६ रोजी अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधातील राष्ट्रीय ई-शपथ घेण्यात येणार आहे.
देशातील तरुणांसह समाजात अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे, व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करणे आणि नागरिकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून दूर ठेवणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांनी NMBA पोर्टलवर ‘नशामुक्त मित्र’ म्हणून नोंदणी करावी. तसेच ‘National Pledge Against Drug Abuse’ ही ई-शपथ घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अमली पदार्थांच्या व्यसनासंदर्भात मार्गदर्शन आणि मदतीसाठी १४४४६ या हेल्पलाईनचा वापर करता येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक, विद्यार्थी आणि युवकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून नशामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.






