मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, विद्यार्थ्यांची घटती संख्या, सांस्कृतिक उपक्रमांवरील खर्च आणि महाविद्यालयाच्या कारभाराबाबत होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या कैलास राबते यांनी सडेतोड खुलासा केला आहे. महाविद्यालयावर टीका करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी प्रथम स्वतःचे आत्मपरीक्षण करावे, सोशल मीडियावर चर्चा करण्याऐवजी प्राचार्यांशी प्रत्यक्ष चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

महाविद्यालयाच्या स्थापनेपासून सांस्कृतिक विभाग कार्यरत असून या विभागातून अनेक कलावंत घडले आहेत. मुंबई विद्यापीठ तसेच राष्ट्रीय स्तरापर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची छाप उमटवली आहे. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीत अनेक सुवर्णपदके, सिल्व्हर मेडल, ब्रांझ मेडल तसेच वैयक्तिक स्वरूपाची अनेक बक्षिसे विद्यार्थ्यांनी पटकावली आहेत. गेल्या दोन वर्षांपर्यंत या परंपरेत कुठेही खंड पडला नसल्याचे प्रभारी प्राचार्यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र, गेल्या दोन वर्षांतील वस्तुस्थिती अशी आहे की विद्यार्थी संख्या घटत आहे. पूर्वीच्या तुलनेत हौशी विद्यार्थी पुढे येत नाहीत. त्यांना तयार करावे लागते आणि त्याचबरोबर त्यांच्या पालकांनाही तयार करावे लागते. विशेषतः मुली सहभाग घेण्यास अलीकडच्या काळात पुढे येत नसल्याची बाब चिंतेची आहे.
विद्यापीठाने मूल्यांकनाची क्रायटेरीया बदलली असून पूर्वी तिसरा व चौथा नंबरदेखील विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स पाहून काढला जात होता. मात्र, अलीकडे दोनच नंबर काढले जातात, असेही त्यांनी म्हटले आहे.
विद्यार्थी संख्या घटत असल्यामुळे सांस्कृतिक विभागावर होणारा खर्च मोठा आहे. विद्यापीठाने ठरवून दिलेल्या नियमानुसार पैसा खर्च करावा लागतो. इतर महाविद्यालयांमध्ये एका समूह नृत्यावर, एकांकिकेवर व समूहगीतावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. काही महाविद्यालये ६० ते ७० हजार रुपयांपर्यंत खर्च करतात. मात्र, विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत असल्याने कल्चर फी अत्यल्प गोळा होते आणि त्यातूनच वार्षिक स्नेहसंमेलन पार पाडावे लागते, असे प्रभारी प्राचार्यांनी स्पष्ट केले आहे.
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाला उज्ज्वल परंपरा होती, हे मान्य आहे आणि ती परंपरा टिकवून ठेवली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. काळानुरूप सर्वच बाबतीत बदल होत आहेत. चुका दाखविणे सोपे आहे, त्याला पैसे लागत नाहीत; मात्र प्रत्यक्ष काम करणे अवघड आहे. मुलांचा प्रतिसाद मिळाला नाही तर एखाद्या वर्षी निकालाच्या बाबतीत असे होऊ शकते. हा विद्यापीठ कमिटीने दिलेला निकाल असून त्या तज्ज्ञ मंडळींना आपण चॅलेंज करू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
माजी विद्यार्थ्यांकडून पूर्वी गावातून पैसे गोळा करून एखाद्या इव्हेंटवर खर्च केला जात होता. मात्र, गोळा झालेल्या पैशांचा हिशोब महाविद्यालयाने मागितला तर काहीजण तो देत नसत. काहीजण कॉलेजच्या पैशावर एकांकिका, फोकडान्स बसवत आणि नंतर त्याचा वैयक्तिक फायदा तसेच व्यावसायिक उपयोग करून पैसे कमवत असल्याचे अनुभवही असल्याचा दावा प्रभारी प्राचार्यांनी केला आहे.
या सततच्या बदनामीमुळेच महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे. महाविद्यालयाविषयी आस्था असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारची निंदा करणे चुकीचे आहे. याचा माजी विद्यार्थ्यांनी गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
सोशल मीडियावर एखाद्या विभागाची चर्चा करण्यापेक्षा प्राचार्यांशी चर्चा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वस्तुस्थिती काय आहे, यावर विचारविनिमय करण्याअगोदरच काही गोष्टी बोलल्या जातात, ही गोष्ट निंदनीय आहे. महाविद्यालयाचा एवढा पुळका असेल तर प्रत्यक्ष येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. हे महाविद्यालय सर्वांचेच आहे. माजी विद्यार्थ्यांनी थोडा पैसा आणि थोडा वेळ द्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
प्राध्यापकांच्या कमतरतेविषयी अथवा त्यांच्या पगाराविषयी बोलण्याचा कोणास अधिकार नाही. ते काम करतात आणि त्यांना त्यांचा पगार मिळतो. कोणत्याही प्राध्यापकांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नये, हे आपल्या सारख्यांना शोभत नाही, असेही प्रभारी प्राचार्यांनी स्पष्ट केले.
माजी विद्यार्थी संघटना महाविद्यालयात का स्थापन केली गेली, तिची महाविद्यालयाप्रती कर्तव्ये कोणती आणि महाविद्यालयाच्या विकासाच्या दृष्टीने आपली जबाबदारी कोणती, हे प्रथम समजून घेणे गरजेचे आहे. याच महाविद्यालयातून शिक्षण घेऊन येथील व्यवस्थेविषयी आणि प्राध्यापकांविषयी बोलणे कितपत योग्य आहे, याचेही आत्मपरीक्षण माजी विद्यार्थ्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोणतीही घटना घडल्यानंतर संबंधित प्राचार्यांशी बोलणे, समस्या समजून घेणे आणि परिस्थितीचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे. मात्र, असे न करता उलटसुलट चर्चा करून महाविद्यालयाची नाहक बदनामी करणे येथून पुढच्या काळात खपवून घेतले जाणार नाही. त्याला सडेतोड उत्तरे दिली जातील, असा इशाराही प्रभारी प्राचार्यांनी दिला आहे.
माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील कोणत्याही विभागाबाबत बोलताना भान ठेवणे आवश्यक आहे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला उत्तर देण्यासाठी प्राचार्य व संबंधित विभागप्रमुख सक्षम आहेत. त्यांचा अधिकार आपणास पोहोचत नाही, हे लक्षात ठेवावे आणि येथून पुढे असे प्रकार होऊ नयेत याची सर्वांनीच खबरदारी घ्यावी, असे या खुलाशात म्हटले आहे.







