सावंतवाडी, वार्ताहर : मागील ४१ वर्षांपासून साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या ‘आरती’ मासिकातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही कै. विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात होणार आहे.
गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरती मर्यादित असलेल्या या स्पर्धेत १८ वर्षांवरील स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी सादर करण्यात येणारी कविता स्वरचित आणि दीर्घ नसावी, अशी अट आयोजकांनी ठेवली आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना स्पर्धेनंतर लगेचच मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, ग्रंथभेट आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे उषा परब (९४२३८१८८२८) किंवा भरत गावडे यांच्याकडे २५ ऑगस्टपर्यंत नोंदवावीत, असे आवाहन ‘आरती’ मासिकाच्या कार्यकारिणीने केले आहे.
सिंधुदुर्गातील नामवंत साहित्यिक कै. विद्याधर भागवत यांचे साहित्यिक चळवळीतील योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. त्यांच्या साहित्यिक कार्याच्या स्मरणार्थ आणि जयंतीनिमित्त दरवर्षी ही काव्यवाचन स्पर्धा आयोजित केली जाते. या उपक्रमामुळे नवोदित कवी आणि साहित्यप्रेमींना आपली सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत आहे.






