मालवण, दि. ११ : प्रतिनिधी
‘स्वच्छ समुद्रकिनारा, सुंदर मालवण’ या उद्देशाने मालवण नगरपालिकेच्या आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्या संकल्पनेतून चिवला बीच येथे मंगळवारी सकाळी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ ते ९ या दोन तासांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल ५०० किलो कचरा संकलित करण्यात आला.
मालवण नगरपालिकेच्या आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. बांधकाम सभापती तथा लायन्स क्लबचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्यासह लायन्स क्लबचे सदस्य, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले.
स्वच्छता मोहिमेदरम्यान चिवला बीच परिसरातील प्लास्टिक, विविध प्रकारचा कचरा तसेच इतर घाण गोळा करून समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला. नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.
चिवला बीच हा मालवणच्या पर्यटनाचा महत्त्वाचा भाग असून, येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने अशा मोहिमा सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
या विशेष स्वच्छता मोहिमेमुळे चिवला बीच परिसराला स्वच्छ आणि सुंदर स्वरूप प्राप्त झाले असून, ‘स्वच्छ समुद्रकिनारा, सुंदर मालवण’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.






