मालवण (प्रतिनिधी)
निरोगी आणि सुदृढ बालकाच्या वाढीसाठी आईचे दूध हे सर्वोत्तम अन्न असून, ते बाळासाठी अमृततुल्य आहे, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर यांनी केले.
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आचरा ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, मालवण प्रकल्प अधिकारी उल्का खोत, ग्रामपंचायत सदस्या पूर्वा तारी, सायली सारंग यांच्यासह आचरा गावातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी प्रकल्प अधिकारी उल्का खोत यांनी जागतिक स्तनपान सप्ताहाचे महत्त्व स्पष्ट करत मातांना स्तनपानाच्या फायद्यांची माहिती दिली. बाळाच्या जन्मानंतर शक्यतो पहिल्या तासात स्तनपान सुरू करणे आणि जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाला केवळ आईचे दूध देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बाळाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि योग्य पोषणाबाबत उपस्थित मातांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने पोषण आहार तसेच रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनातून माता आणि महिलांमध्ये योग्य आहार व बालपोषणाबाबत जनजागृती करण्यात आली.






