मालवण | प्रतिनिधी
मालवण तालुक्यात वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या प्रकारावरून पंचायत समितीच्या मासिक सभेत बुधवारी जोरदार खडाजंगी झाली. “ग्राहकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसविले तर आम्हीच ते काढून फेकून देऊ,” असा आक्रमक इशारा पंचायत समिती सदस्य बंडू चव्हाण यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. याचबरोबर ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत, असा ठरावही सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेला उपसभापती घनश्याम झाड, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, सदस्य दीपक सुर्वे, रिया बावकर, योजना कांबळी, माधुरी मसुरकर, मानसी भोगावकर, छोटू ठाकूर, गणेश तोंडवळकर, बंडू चव्हाण तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
स्मार्ट मीटरवरून अधिकाऱ्यांना धारेवर
स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना भरमसाठ वीज बिले येत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सदस्यांनी महावितरणचे अभियंता सचिन म्हेत्रे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
“मुख्यमंत्र्यांनीही ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत, असे स्पष्ट केले असताना महावितरण ग्राहकांची संमती न घेता जुने मीटर बदलत आहे. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” असा थेट सवाल बंडू चव्हाण यांनी केला.
यावर अभियंता म्हेत्रे यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राहकांना पूर्वकल्पना देऊन स्मार्ट मीटर बसविले जात असल्याचे सांगत, स्मार्ट मीटरचे अनेक फायदे असल्याचा दावा केला. मात्र, त्यावर संतप्त प्रतिक्रिया देत बंडू चव्हाण म्हणाले, “सभेत स्मार्ट मीटरची जाहिरात करू नका. तुम्ही मीटर बसवा, आम्ही लोकशाही मार्गाने त्याला विरोध करू.”
पावसापूर्वी झाडांच्या फांद्या का छाटल्या नाहीत?
पावसाळ्यात झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर कोसळून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचा मुद्दाही सभेत उपस्थित झाला. भाजपचे गटनेते दीपक सुर्वे यांनी, “रात्री-अपरात्री वीज कर्मचारी जीव धोक्यात घालून दुरुस्ती करतात. पावसापूर्वी धोकादायक फांद्या छाटण्याचे नियोजन का केले जात नाही?” असा सवाल उपस्थित केला. तसेच रात्रीच्या वेळी कर्मचाऱ्यांना कामावर पाठविताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
भूमिगत वीज वाहिनीच्या कामावर प्रश्नचिन्ह
योजना कांबळी यांनी कांदळगाव येथील भूमिगत वीजवाहिनीच्या कामावर टीका करत मुसळधार पावसात रस्त्यालगत बसविलेले लाल रंगाचे सुरक्षा बॉक्स कोसळल्याचा मुद्दा मांडला. या कामात निकृष्ट दर्जाचा वापर झाल्याचा आरोप त्यांनी केला. यावर अभियंता म्हेत्रे यांनी कोसळलेले बॉक्स तातडीने दुरुस्त करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
वीज विभागासह एसटीतील रिक्त पदांचाही प्रश्न ऐरणीवर
वीज विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, असा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे मालवण एसटी आगारात सुमारे ७० पदे रिक्त असल्याने बसफेऱ्यांवर परिणाम होत असल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली. बंद असलेल्या बसफेऱ्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी दीपक सुर्वे यांनी केली, तर सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी मालवण-पणजी बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. बंडू चव्हाण यांनी एसटी प्रवासी ओळखपत्रासाठी गावागावात विशेष शिबिरे आयोजित करण्याची सूचना केली.
रखडलेल्या रस्त्याच्या कामावर उपोषणाचा इशारा
मसुरे-डांगमोडे रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडल्याबद्दल सदस्य छोटू ठाकूर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अर्धवट कामामुळे अपघात वाढत असल्याचे सांगत, काम तातडीने पूर्ण न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला.
शिक्षक, अंगणवाडी आणि हवामान केंद्राचेही प्रश्न
तालुक्यात ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे तेथे तातडीने शिक्षक नियुक्त करावेत, तसेच नियुक्ती झाल्यानंतरही रुजू न झालेल्या शिक्षकांना नोटीस बजावावी, अशा सूचना सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी शिक्षण विभागाला दिल्या.
अंगणवाडी सेविका व मदतनीसांची रिक्त पदे पदोन्नतीद्वारे भरण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. कुंभारमाठ येथील म्हाडा वस्तीमध्ये नवीन अंगणवाडी सुरू करण्याची मागणी मानसी भोगावकर यांनी केली, तर दीपक सुर्वे यांनी चिंदर येथे हवामान मापक यंत्र बसविण्याची मागणी केली.
सभेत दशावतार कलेसाठी शासनाने अनुदान दुप्पट केल्याबद्दल तसेच मालवण ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञांची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न करणारे आमदार निलेश राणे यांचे अभिनंदन करणारा ठरावही मंजूर करण्यात आला.







