४५ ते ५० कलाकारांचा सहभाग; नृत्य, नाट्य, संगीत, अभंग आणि वारकरी परंपरेचा अविस्मरणीय अनुभव
कुडाळ | प्रतिनिधी
आषाढी एकादशीनंतर विठ्ठलभक्तीचा रंग अधिकच गडद करण्यासाठी कुडाळमध्ये एक आगळावेगळा सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे. सई एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि हर्षनाद सादर करीत असलेला ‘संतरंग – प्रवास वारीचा… विठ्ठल भेटीचा…’ हा संगीत, नृत्य, नाट्य आणि गायनाचा बहुरंगी कार्यक्रम शनिवार, १८ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ येथे होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल ४५ ते ५० गुणी कलाकारांच्या सहभागातून साकारला जाणारा हा कार्यक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, संतवाङ्मय, अभंग, भक्तीभाव आणि पंढरपूरच्या वारीचा आध्यात्मिक प्रवास रसिकांसमोर जिवंत करणार आहे. नाट्य, नृत्य, संगीत, गायन आणि वादन यांच्या सुरेल संगमातून उपस्थितांना प्रत्यक्ष वारीत सहभागी झाल्याचा भावस्पर्शी आणि अविस्मरणीय अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
कार्यक्रमात वारीतील रिंगण, अभंगांचा अखंड गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद, वारकऱ्यांचा उत्साह आणि विठ्ठल भेटीची ओढ यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात येणार आहे. भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला हा सांस्कृतिक आविष्कार सर्व वयोगटातील रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
या कार्यक्रमाची निर्मिती हर्षनिल यांची असून, संकल्पना आणि प्रमुख गायनाची जबाबदारी हर्षद प्रमोद मेस्त्री यांनी सांभाळली आहे. कार्यक्रमाचे दिग्दर्शन निलेश बळकृष्ण गुरव यांचे असून, गीत व संत रचना प्रथमेश मेस्त्री, संवाद प्रथमेश पवार, नृत्य दिग्दर्शन भूषण बाक्रे, समर्थ गवंडी आणि तेजस पिंगुळकर, संगीत संयोजन योगेश प्रभू व हर्षनाद टीम, संयोजन कल्पेश मेस्त्री व हर्षनाद टीम, तर व्यवस्थापन विजय वालावलकर आणि सावन जळवी यांनी केले आहे. संकल्प क्रिएशन डान्स अकॅडमीचे विशेष सहकार्य या कार्यक्रमाला लाभले आहे.
वारकरी परंपरेचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दर्शन घडविणाऱ्या या भक्तिमय सोहळ्याचा सिंधुदुर्गातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.







