कणकवली (प्रतिनिधी):
कणकवली येथे कोकणचे ज्येष्ठ नेते व खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे वर्ष ‘अमृत महोत्सवी पदार्पण वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय महायुतीतर्फे घेण्यात आल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सोहळ्यासाठी राज्य व केंद्रातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या वाढदिवस सोहळ्यासाठी राज्य आणि केंद्रातील मोठ्या प्रमाणावर मंत्रिमंडळाची उपस्थिती लाभणार असल्याचे बोलले जात आहे.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून बॉलिवूड अभिनेते संजय दत्त यांची उपस्थिती राहणार असून, कार्यक्रमानंतर प्रसिद्ध गायक सोनू निगम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान, या वाढदिवसानिमित्त एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. पुष्पगुच्छ न देता पुस्तके भेट देण्याचे आवाहन नारायण राणे यांनी कार्यकर्ते व चाहत्यांना केले आहे. संकलित पुस्तके विविध ग्रंथालयांना दान करण्यात येणार असून, कोकणातील वाचन संस्कृतीला चालना देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. दर महिन्याच्या १० तारखेला हे उपक्रम पार पडतील, ज्यामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे.
हा भव्य सोहळा १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदान, कणकवली येथे पार पडणार असून, कार्यक्रमासाठी विशेष आसन व्यवस्था करण्यात आली आहे. कोकणातील जनतेमध्ये या कार्यक्रमाबद्दल मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.







