मालवण : प्रतिनिधी
मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई या संस्थेच्या वतीने मसुरे गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा भव्य सत्कार सोहळा मुंबईतील दादर येथे पार पडला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक परब मुळीक आणि मुंबई कमिटीचे सचिव प्रसाद बागवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी बोलताना डॉ. दीपक परब मुळीक यांनी मसुरे एज्युकेशन सोसायटी ही संस्था गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असल्याचे सांगितले. गावातील ग्रामस्थांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणारी ही एकमेव संस्था असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. भविष्यातही सर्वांनी एकत्र येऊन संस्थेला अधिक नावारूपास आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
या सोहळ्यात मसुरे सहकारी पतपेढी मर्यादित मुंबईच्या नूतन संचालक मंडळाचा, संस्थेतील विशेष योगदान देणाऱ्या सभासद व पदाधिकाऱ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर आणि युवा उद्योजक जयेश दीपक परब यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला उपाध्यक्ष उत्तम राणे, लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब यांच्यासह अनेक मान्यवर आणि मसुरे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध मान्यवरांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रसाद बागवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजन परब यांनी मानले.







