मालवण : प्रतिनिधी
नॅशनल आयुष मिशन अंतर्गत ग्रामीण रुग्णालय मालवण येथील आयुष कक्षामार्फत सोमवारी आयुष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून विविध आजारांबाबत रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांच्या हस्ते झाले. शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथील आयुर्वेद तज्ञ डॉ. योगेश गोडकर आणि होमियोपॅथी तज्ञ डॉ. राजेश पालव यांनी उपस्थित राहून रुग्णांना मार्गदर्शन व उपचार सेवा दिली. शिबिरासाठी आलेल्या रुग्णांच्या अल्पोपहाराची व्यवस्था रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली होती.
शिबिरात संधिवात, सांधे व गुडघेदुखी, पाठदुखी, मानदुखी, त्वचारोग (खाज, खुजली, एक्झिमा), पचनाचे त्रास (अम्लपित्त, बद्धकोष्ठता), तसेच श्वसनाचे आजार (दमा, सर्दी, खोकला) यांसारख्या आजारांवर मोफत आयुर्वेदिक व होमियोपॅथी तपासणी करून औषधांचे वितरण करण्यात आले. याशिवाय मधुमेह व उच्च रक्तदाबाबाबत मार्गदर्शन देण्यात आले. तसेच स्त्रीरोग व बालरोग संदर्भातही रुग्णांना सल्ला व आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
हे शिबिर यशस्वीपणे पार पडल्याबद्दल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ यांनी सर्व संबंधितांचे आभार मानले.






