मालवण (प्रतिनिधी)
मालवण येथील दिवाणी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण ४० प्रकरणे तडजोडीने मिटवून निकाली काढण्यात आली.
या लोकअदालतीमध्ये मालवण येथील दिवाणी न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी १६ प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणांतील २४ प्रकरणे अशी मिळून एकूण ४० प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधील एकूण रक्कम ४ लाख ४५ हजार १८५ रुपये इतकी आहे. या लोकअदालतीत मालवण तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका, ग्रामपंचायत तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांसारख्या संस्थांची वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. या लोकअदालतीसाठी विशेष पॅनेलची नियुक्ती करण्यात आली होती. पॅनेल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समिती, मालवणचे अध्यक्ष मोहम्मद कैसर फकिह यांनी काम पाहिले, तर विधिज्ञ एस. के. जाधव यांनी पॅनेल सदस्य म्हणून सहभाग घेतला.
न्यायालयाचे सहायक अधीक्षक एस. एन. पालव, लघुलेखक डी. डी. तिबिले, वरिष्ठ लिपिक यु. एन. मालणकर, ए. एस. चव्हाण, कनिष्ठ लिपिक एस. व्ही. परब, एल. आर. कांबळी, सी. एम. गोसावी, एम. पी. जाधव तसेच कर्मचारी पी. ए. तारी व ए. डी. सरंगले यांचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सरकारी अॅड. यु. आर. जाधव तसेच पंचायत समिती, मालवणचे विस्तार अधिकारी परब व हांडे आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.







