Pawashi ZP Election: Shiv Sena (UBT) candidates Amarsen Sawant and Apa Manjrekar campaigned in Humarmala with ward-wise meetings led by Vinayak Raut & Vaibhav Naik.
कणकवली प्रतिनिधी : पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार अमरसेन सावंत आणि डिगस पंचायत समितीचे उमेदवार नारायण उर्फ आपा मांजरेकर यांच्या प्रचारार्थ हुमरमळा गावात वाडीवार बैठका घेण्यात आल्या. या प्रचार सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजी खासदार विनायक राऊत व माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी उपसभापती जयभारत पालव यांच्या सूचनेनुसार या बैठका आयोजित करण्यात आल्या.
या बैठकीदरम्यान गावातील वाडीवस्तीतील नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. स्थानिक प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, रोजगार, शेतकरी प्रश्न तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. नागरिकांनी आपल्या अपेक्षा मांडत उमेदवारांकडून विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कामांची मागणी केली.
या वेळी उपस्थितांना संबोधित करताना माजी खासदार विनायक राऊत यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांचे ग्रामीण विकासातील महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “स्थानिक प्रश्नांची जाण असलेले लोकप्रतिनिधी निवडून देणे आवश्यक आहे. अमरसेन सावंत व आपा मांजरेकर हे जनतेशी थेट जोडलेले उमेदवार असून त्यांच्या माध्यमातून पावशी आणि डिगस भागाचा सर्वांगीण विकास साधता येईल.”
माजी आमदार वैभव नाईक यांनीही विकासाच्या मुद्द्यांवर भर देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या धोरणांची माहिती दिली. जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी संघटनात्मक ताकद वाढवून प्रत्येक वाडीत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
वाडीवार बैठकीमुळे प्रचाराला वेग आला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. गावपातळीवर घराघरांत पोहोचून मतदारांशी संवाद साधण्याची रणनीती राबवली जात आहे. या बैठकींना महिलांसह तरुणांचा सहभागही लक्षणीय होता.







