मालवण, दि. प्रतिनिधी :
मालवण नगरपालिकेतील प्रशासकीय राजवटीच्या काळात तब्बल एक वर्षाहून अधिक काळ पथदीपाविना अंधारात असलेल्या मालवण शहरातील वायरी हिंदळेकर वाडी परिसरात अखेर उजेड पडला आहे. जी-१० पासून पुढील सात वीज खांबांवरील बंद अवस्थेतील स्ट्रीटलाईट्स मालवण नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आल्याने या मार्गावरील अंधाराचे साम्राज्य संपुष्टात आले आहे.
वायरी हिंदळेकर वाडीतील हा मुख्य रस्ता गेल्या वर्षभरापासून पूर्णतः अंधारात होता. यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिलांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासकीय राजवटीच्या काळात या समस्येकडे दुर्लक्ष झाले होते.
नुकत्याच निवडून आल्यानंतर नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांनी या प्रश्नाची दखल घेत तातडीने कार्यवाही केली. त्यांनी स्वतः प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून विद्युत वाहिन्यांमध्ये अडथळा ठरणारी झाडे व झाडीझुडपे साफ करून घेतली. त्यानंतर तांत्रिक बिघाड दुरुस्त करून या भागातील सातही पथदीप सुरू करण्यात आले. त्यामुळे वर्षभरानंतर हा संपूर्ण मार्ग प्रकाशमान झाला आहे.
याबाबत बोलताना नगरसेविका अन्वेषा आचरेकर म्हणाल्या की, “नागरिकांची सुरक्षा आणि मूलभूत सुविधा हीच आमची प्राथमिकता आहे. प्रलंबित व रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
पथदीप सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेविका आचरेकर यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले आहे.







