मालवण | प्रतिनिधी
मालवण शिवसेनेत संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचा बदल घडून आला असून, देवबाग विभागप्रमुख मंदार संजय लुडबे यांना बढती देत मालवण तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे मालवण तालुक्यात शिवसेनेच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाल्याची चर्चा असून, पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
शिवसेनेचे देवबाग विभागप्रमुख मंदार संजय लुडबे यांची मालवण तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी हे पद सांभाळणारे राजा गावडे यांच्या जागी मंदार लुडबे यांची निवड करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मंदार लुडबे यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार केला.
नियुक्तीपत्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण सक्रियपणे प्रचार–प्रसार करावा, तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन संघटनात्मक कार्य करावे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रसंगी तालुकाप्रमुख विनायक बाईत, माजी तालुकाप्रमुख राजा गावडे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, संदीप परब, युवासेना तालुकाप्रमुख अभि लाड, शिवसेना तालुका चिटणीस मकरंद राणे, छोटू ठाकूर, संदीप भोजणे, उमेश बिरमोळे, महेश लुडबे, सुरज बिरमोळे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंदार लुडबे यांच्या नियुक्तीमुळे मालवण तालुक्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.








