मालवण | प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील तळाशील येथील श्री गोपाळकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेचा ४८ वा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दि. २९ जानेवारीपासून मोठ्या भक्तिभावात सुरू होत असून, पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन श्री गोपाळकृष्ण मंदिर समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
गुरुवार दि. २९ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता अभिषेक सोहळ्याने कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. सकाळी ९ वाजता महापूजा, हळदीकुंकू, आरती व तीर्थप्रसाद होईल. सायंकाळी ५ वाजता ह. भ. प. महेश बुवा धामापूरकर (मालवण) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची भजने, रात्री १० वाजता मान्यवरांचा सत्कार सोहळा तर रात्री ११ वाजता दोन अंकी हृदयस्पर्शी मालवणी नाटक ‘वाट चुकलो देव’ (लेखक – किशोर तळवळकर, दिग्दर्शक – नंदकुमार तळवडेकर, आयोजक – श्री गोपाळकृष्ण सवंगडी मंडळ, तळाशील) सादर करण्यात येणार आहे.
शुक्रवार दि. ३० जानेवारी रोजी सकाळी सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद होईल. रात्री १० वाजता शालेय मुलांचा गुणगौरव सोहळा तर रात्री साडेदहा वाजता सामाजिक नाटक ‘छुमंतर’ (श्री गोपाळकृष्ण कला विभाग, मुंबई) सादर होणार आहे.
शनिवार दि. ३१ जानेवारी रोजी दुपारी महाप्रसाद, दुपारी ३ वाजता फनी गेम्स स्पर्धा (आयोजक – गुड बॉईज ग्रुप, तळाशील) होतील. रात्री १० वाजता फुल टू धमाल दोन अंकी विनोदी नाटक ‘दिसतं तसं नसतं’ (सादरकर्ते – आकांक्षा मित्र मंडळ, तळाशील) सादर होईल.
रविवार दि. १ फेब्रुवारी रोजी अक्षय सातार्डेकर प्रस्तुत ‘आर्केस्ट्रा स्वर अक्षय’ हा सांस्कृतिक कार्यक्रम (आयोजक – गुड बॉईज ग्रुप, तळाशील) आयोजित करण्यात आला आहे.
सोमवार दि. २ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता दोन अंकी तुफान विनोदी नाटक ‘काका किशाचा’ (सादरकर्ते – श्री देव गोपाळकृष्ण कला मंच, तळाशील) सादर होणार आहे.
या पाच दिवसीय धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी व रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गोपाळकृष्ण मंदिर समिती व तळाशील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.








