कुडाळ | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील सरंबळ गावातील मनोहर जाधव यांच्या दोन महिन्यांच्या चिमुकल्यावर आवश्यक असलेले ३ लाख २५ हजार रुपये खर्चाचे महत्त्वपूर्ण ऑपरेशन आमदार निलेश नारायण राणे यांच्या पुढाकारातून पूर्णतः मोफत करण्यात आले. आमदार निलेश राणे यांच्या राणे प्रतिष्ठान मेडिकल ग्रुपच्या माध्यमातून ही वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली.
जन्मत:च गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या या बालकाच्या उपचारासाठी मोठ्या खर्चाची आवश्यकता होती. आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंबावर चिंतेचे सावट होते. ही बाब आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास येताच, ऑपरेशनची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारली आणि तातडीने आवश्यक वैद्यकीय मदतीची व्यवस्था करण्यात आली.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले असून, सध्या बालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. आमदार निलेश राणे यांच्या या सामाजिक जाणिवेतून दिलेल्या मदतीमुळे जाधव कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राणे प्रतिष्ठान मेडिकल ग्रुपच्या माध्यमातून यापूर्वीही अनेक गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत देण्यात आली असून, सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी केले जाणारे हे कार्य समाजात आदर्श ठरत आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.







