मालवण | प्रतिनिधी
मालवण नगरपालिकेत शिवसेनाप्रमुख वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास शिवसेना उबाठा पक्षाचे नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेवक मंदार ओऱसकर, तपस्वी मयेकर, महेंद्र म्हाडगूत, अनिता गिरकर यांच्यासह पूजा करलकर, प्रमोद करलकर, दीपा शिंदे, बबन वाघ, निलेश दुधवडकर, बंड्या सरमळकर, माधुरी प्रभू तसेच मालवण नगरपालिकेतील कर्मचारीही उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगरसेवक मंदार ओऱसकर यांनी सत्ताधाऱ्यांवर खरमरीत टीका केली. “वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आज खऱ्या अर्थाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच चालवत आहे. मात्र बाळासाहेबांच्या फोटोवर आणि नावावर मत मागणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आज जयंतीच्या दिवशीच त्यांचा विसर पडलेला दिसतो, याचा खेद वाटतो,” अशी टीका त्यांनी केली. उपस्थित शिवसैनिकांनीही यास दुजोरा दिला.
दरम्यान, भविष्यात बाळासाहेबांचे लाडके मालवण शहर त्यांच्या लौकिकाला साजेसे बनवण्याचा निर्धार शिवसेना उबाठा पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी व्यक्त केला. “बाळासाहेबांच्या विचारांवर काम करून शहराचा विकास करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे,” अशी भावना यावेळी नगरसेवकांनी व्यक्त केली.





