● उद्घाटन रवींद्र माणगावे यांच्या हस्ते; नारायण राणे, नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
● व्यापार, उद्योग, पर्यटन व महिला उद्योजकतेतील मान्यवरांचा पुरस्काराने सन्मान
● ज्येष्ठ व्यापारी राजाराम कदम यांना जीवनगौरव पुरस्कार
● पुरस्कार वितरण कार्यक्रमात डिजिटल पद्धतीने सादरीकरण होणार
देवगड | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३८ वा व्यापारी एकता मेळावा शुक्रवार, ३१ जानेवारी रोजी देवगड तालुका व्यापारी संघाच्या वतीने शेठ म ग हायस्कूलच्या प्रांगणात उत्साहात संपन्न होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन रवींद्र माणगावे (अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्री) यांच्या हस्ते होणार आहे.
या मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून रामभाऊ भोगले (चेअरमन, अप्लायमेंट इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ग्रुप, माजी अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर) आणि श्री महेश चव्हाण (संस्थापक, आय ४१ इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस प्रा. लि.) मार्गदर्शन करणार आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या व्यापारी एकता मेळाव्यात व्यापार, उद्योग, पर्यटन, महिला उद्योजकता व सामाजिक कार्य या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. देवगड तालुका व्यापारी संघाच्या वतीने यावर्षी दोन विशेष पुरस्कार देण्यात येणार असून, आदर्श पर्यटन उद्योजक पुरस्कार श्रीकांत जोईल व वैष्णवी जोईल या बंधू-भगिनींना, तर शेती व व्यापार यांची यशस्वी सांगड घालणारे उद्योजक प्रसन्न गोगटे यांना आदर्श व्यापारी व शेतकरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम यांनी दिली.
३८ व्या व्यापारी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर देवगड येथील व्यापारी संघाच्या कार्यालयात जिल्हा व्यापारी महासंघ व तालुका व्यापारी संघाची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, जिल्हा कार्यवाह नितीन वाळके, देवगड तालुकाध्यक्ष शैलेश कदम, प्रमोद नलावडे, मिलिंद मोहिते, मिलिंद कुबल, प्रियांका साळसकर, दयाळ गावकर आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा अत्यंत मानाचा जीवनगौरव पुरस्कार यंदा देवगड तालुक्यातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित व्यापारी राजाराम कदम यांना जाहीर करण्यात आला आहे. सचोटीने व्यापार करत समाजसेवेला प्राधान्य देणाऱ्या आणि व्यापारी संघटनेच्या कार्यात तन-मन-धनाने योगदान देणाऱ्या कदम यांना हा पुरस्कार खासदार नारायण राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
तसेच महासंघाचा कै. माई ओरसकर स्मृती आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार देवगड येथील सुषमा सदानंद देसाई यांना, कै. भाईसाहेब भोगले स्मृती पहिल्या पिढीचा युवा उद्योजक पुरस्कार विजय उर्फ बंटी प्रमोद कदम (देवगड) यांना, तर पर्यटन व सेवा उद्योगातील योगदानासाठी दिला जाणारा कै. बापू नाईक स्मृती पुरस्कार दोडामार्ग येथील ‘रानमाणूस’ म्हणून परिचित प्रसाद गावडे यांना जाहीर झाला आहे.
याशिवाय उत्कृष्ट तालुकाध्यक्ष पुरस्कार मालवण तालुकाध्यक्ष उमेश नेरुरकर यांना देण्यात येणार आहे. उमेश शिरसाट स्मृती आदर्श कार्यकर्ता पुरस्कार व कै. प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्काराबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
यंदा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम अभिनव पद्धतीने होणार असून, प्रत्येक पुरस्कारार्थीच्या कार्यावर आधारित लघु मुलाखती व क्षणचित्रे डिजिटल स्क्रीनवर सादर करण्यात येणार आहेत. त्यानंतर शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असेल, अशी माहिती जिल्हा कार्यवाह नितीन वाळके यांनी दिली.






