वेंगुर्ला, प्रतिनिधी ;
पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्त (दि. २ ते ८ जानेवारी २०२६) सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीने वेंगुर्ला कॅम्प मैदानावर खुल्या मॅराथॉन स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
माननीय पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व माननीय अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली, वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निसर्ग ओतारी यांच्या पुढाकाराने ही मॅराथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सर्व वयोगटातील विद्यार्थी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय कार्यालयातील कर्मचारी, पोलीस पाटील, होमगार्ड, खेळाडू तसेच शाळा व महाविद्यालयांतील युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत तालुक्यातील सुमारे १०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक कांबळे (वेंगुर्ला पोलीस ठाणे), बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. जयसिंग नाईक, प्रा. कमलेश कांबळे, प्रा. वासुदेव गावडे, प्रा. सौ. शिवकन्या तोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे —
पुरुष गट :
प्रथम – शंकर परब
द्वितीय – प्रशांत खोत (होमगार्ड)
तृतीय – तेजस देसाई (होमगार्ड)
महिला गट :
प्रथम – तेजस्वी धुरी (होमगार्ड)
द्वितीय – मृणाली नेरुरकर (होमगार्ड)
तृतीय – शिवन्या चिचकर (पोलीस पाटील)
या मॅराथॉन स्पर्धेमुळे पोलीस दल व नागरिकांमधील सुसंवाद वाढण्यासोबतच आरोग्य व तंदुरुस्तीचा संदेश समाजात पोहोचल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.






