मालवण, दि. प्रतिनिधी : “ज्या दानाने कुणाचे आयुष्य वाचते, ते दान म्हणजे रक्तदान” या विचारातून रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणिजधामचे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून गतवर्षीप्रमाणे यावर्षीही मालवणमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात हे रक्तदान शिबिर पार पडणार आहे. “रक्तदान हे श्रेष्ठदान आहे” असे म्हटले जाते. रक्तदान शिबिरात सहभागी होणे म्हणजे कुणाच्या तरी आयुष्याला नवी आशा देणे होय, असे आयोजकांनी सांगितले.
प्रत्येक सक्षम व्यक्तीने समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून रक्तदान करावे, या उदात्त हेतूने दि. ४ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत सर्वत्र रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली असून, त्याचाच एक भाग म्हणून मालवण येथे हे शिबिर होत आहे.
या रक्तदान शिबिराचा जास्तीत जास्त रक्तदात्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संप्रदाय तालुका सेवा समिती, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.






