मालवण, दि. प्रतिनिधी :
मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिले जाणारे विविध क्षेत्रातील मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण रविवार, ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूलच्या सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्यास कुडाळ–मालवणचे आमदार मा. निलेश राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावर्षी स्व. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्रीगणेश गांवकर यांना जाहीर झाला आहे. तर स्व. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री. सुधीर पडेलकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट पत्रकारितेतील प्रभावी मांडणीसाठी प्रशांत हिंदळेकर यांना ‘बेस्ट स्टोरी अवॉर्ड’ जाहीर करण्यात आला आहे.
तसेच सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत डॉ. ज्योती तोरसकर यांना मालवण रत्न पुरस्कार, तर कला क्षेत्रातील योगदानाबद्दल निलेश गवंडी यांना कला रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम, जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर आणि जिल्हा कार्यकारणी सदस्य अमित खोत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तसेच यावेळी पत्रकार समितीच्या वतीने आयोजित, पत्रकार समिती सदस्यांसाठी गणेश सजावट स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आली होती. यातील विजेते नितीन गावडे (प्रथम क्रमांक), भूषण मेतर (द्वितीय), प्रफुल्ल देसाई (तृतीय), केशव भोगले (उत्तेजनार्थ प्रथम), मनोज चव्हाण उत्तेजनार्थ द्वितीय), अर्जुन बापर्डेकर (उत्तेजनार्थ प्रथम) यांचा सन्मान होणार आहे.
पत्रकार समितीतील काही सदस्य तसेच काही सदस्य कुटुंबियांनी गतवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केले. तालुका स्तरापासून अगदी जिल्हास्तरापर्यत सन्मान प्राप्त झाले. यात महेश सरनाईक, संतोष गावडे, शुभांगी खोत, प्राजक्ता पेडणेकर यांचा समावेश असून त्यांचा विशेष सत्कार यावेळी होणार आहे.
मुख्य सत्कार सोहळा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी सकाळी ९. ३० ते १०. ३० या वेळेत परिसरातील प्रशालेतील मुलांचे ग्रुप डान्स तसेच दयानंद पेडणेकर यांचे कराओके गायन आदी कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमास पत्रकार बांधव, मान्यवर, तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.






