पहिल्या हिंदी काव्यसंग्रहाचे कोळंब येथे शानदार प्रकाशन; साहित्यरसिकांची उदंड उपस्थिती
मालवण : प्रतिनिधी
मालवणचे प्रख्यात मालवणी कवी बाबला उर्फ रुजारिओ पिंटो यांनी आपल्या पहिल्या हिंदी काव्यसंग्रहाच्या माध्यमातून हिंदी साहित्यविश्वात दमदार प्रवेश केला आहे. ‘माँ मेरी’ या त्यांच्या पहिल्या हिंदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात साहित्यरसिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत झाले.
मराठी राज्यभाषा, मालवणी बोलीभाषा, कोकणी आणि आता हिंदी अशा विविध साहित्यप्रांतांत आपल्या लेखणीची ताकद सिद्ध करणारे रुजारिओ पिंटो हे एकमेवाद्वितीय साहित्यिक व्यक्तिमत्त्व असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक तथा साने गुरुजी कथामालेचे सर्वेसर्वा सुरेश ठाकूर यांनी काढले. आई मेरी यांच्यावरील अफाट श्रद्धेतून पिंटो यांनी आपल्या पहिल्या हिंदी काव्यसंग्रहाला ‘माँ मेरी’ हे नाव देत आपल्या मातेला जणू मानवंदनाच दिली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रकाशन सोहळ्याला कवी रुजारिओ पिंटो यांच्यासह ज्येष्ठ लेखक रवींद्र वराडकर, प्रकाशक प्रमोद कोनकर, नितीन वाळके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. रवींद्र वराडकर यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्यरसिकांनी या सोहळ्याला मोठी उपस्थिती लावली.
यावेळी पिंटो यांचे कुटुंबीय, विशेषतः त्यांच्या मातोश्री मेरी पिंटो, तसेच डॉ. सुभाष दिघे, डॉ. शिल्पा झाट्ये, श्री व सौ. पाटकर, विजय चौकेकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, अजय मुणगेकर, नामानंद मोडक, सिडने रॉड्रीक्स, विलास खानोलकर, बाळू काजरेकर, रवी तळाशिलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
‘लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाहीत’ हा समज पिंटो यांनी खोटा ठरविला
ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र वराडकर यांनी रुजारिओ पिंटो यांच्या साहित्यिक आणि व्यावसायिक प्रवासाचा गौरव केला. विद्यार्थीदशेपासूनच बाबला पिंटो खेळ आणि वाचन या दोन्ही क्षेत्रांत आघाडीवर होते. त्यांच्या आईने अत्यंत कष्टाने उभारलेल्या व्यवसायाचा त्यांनी मोठ्या प्रमाणात विस्तार केला. मात्र उद्योगविश्वात यश मिळवत असतानाच साहित्य क्षेत्रातही कविता, कथा, वात्रटिका, विडंबन अशा विविध साहित्यप्रकारांतून त्यांनी लेखन सुरू ठेवले.
समाजमनाच्या दुखऱ्या नसेवर अचूक बोट ठेवत त्यांनी सातत्याने प्रबोधनाचे काम केले. ‘लक्ष्मी आणि सरस्वती एके ठिकाणी नांदत नाही’ असे म्हटले जाते; मात्र पिंटो यांनी उद्योगविश्वात अफाट यश मिळवत असतानाच साहित्य क्षेत्रातही समर्थपणे लेखन करून हा समज खोटा ठरविला, असे वराडकर यांनी सांगितले.
‘जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी’ या समर्थांच्या उक्तीनुसार आयुष्यभर चोख व्यवहार करताना आईने दिलेल्या संस्कारांची शिदोरी पुढे नेत त्यांनी अनेक कुटुंबांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली आहे. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाची झलक साहित्यिक वाटचालीतही दिसते. त्यामुळेच काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला जिल्हाभरातून रसिकांची मोठी उपस्थिती लाभली. माझा विद्यार्थी म्हणून त्यांचा जेवढा अभिमान आहे, त्याहून अधिक अभिमान शिक्षक म्हणून वाटतो, असेही वराडकर यांनी सांगितले.
‘माझ्या यशाचं श्रेय आईच्या संस्कारांना’
प्रकाशन सोहळ्याला लाभलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना कवी रुजारिओ पिंटो भावूक झाले. वयाच्या अवघ्या सहाव्या महिन्यात पितृछत्र हरपल्यानंतर त्यांच्या आईने अत्यंत कष्टपूर्वक जीवन जगत त्यांना संस्कार आणि जीवनमूल्यांची शिदोरी दिली. याच संस्कारांच्या आधारावर आजवरची वाटचाल केली असल्याचे त्यांनी सांगितले.
आज उद्योजक बाबला पिंटो किंवा कवी बाबला पिंटो म्हणून जे काही यश मिळाले आहे, ते सर्व आपल्या मातेच्या चरणी समर्पित असल्याचे त्यांनी नमूद केले. आईचे नाव ‘मेरी’ असल्यानेच आपल्या पहिल्या हिंदी काव्यसंग्रहाला ‘माँ मेरी’ हे नाव दिले असून हा काव्यसंग्रह आईच्या संस्कारांना समर्पित करत असल्याचे पिंटो यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी काव्यसंग्रहातील ‘मेरी माँ’ या हिंदी कवितेचे भावपूर्ण सादरीकरण केले.
काव्यसंग्रहातील विविध कवितांचे सादरीकरण रश्मी आंगणे, मधुरा माणगावकर, गुरुनाथ ताम्हणकर, रामचंद्र कुबल, अनघा कदम आणि सौ. पिंटो यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमसापच्या ग्रंथपाल ऋतुजा केळकर यांनी केले.
‘माँ मेरी’च्या माध्यमातून रुजारिओ पिंटो यांनी आपल्या मातृऋणाला काव्यरूप देतानाच मालवणच्या साहित्यविश्वाची हिंदीच्या व्यापक पटावर नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.






