आचरा:
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आचरा पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता अभियान आणि जनजागृती मोहीम उत्साहात पार पडली. आचरा ग्रामपंचायत व कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आचरा यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेदरम्यान आचरा महाविद्यालयातील एनएसएस (NSS) स्वयंसेवक, विद्यार्थी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. तसेच स्थानिक नागरिक व पर्यटकांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि ‘प्लास्टिकमुक्त परिसर’ याबाबत प्रभावी जनजागृती केली. या संयुक्त स्वच्छता मोहिमेत किनाऱ्यावरून सुमारे १५० किलो कचरा गोळा करण्यात आला.
उपस्थित मान्यवर:
या उपक्रमाप्रसंगी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, पूर्वा तारी, पिरवाडी पोलीस पाटील तन्वी जोशी तसेच होमगार्ड उपस्थित होते.
तसेच आचरा मॅनेजमेंट स्टडीचे प्राचार्य नितेश सारंग, सहशिक्षक प्रियांका हिंदळेकर, भावना मुणगेकर, आराध्या बागवे, प्राजक्ता त्रिंबककर आणि निशिकांत कमळे यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.






