मालवण, दि. प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून आपली बौद्धिक क्षमता वाढवावी, तसेच मुलांना सामूहिकरीत्या एकमेकांच्या संपर्कात ठेवण्यासाठी समूहाने खेळ खेळणे गरजेचे आहे. या उद्देशाने मालवणच्या भाजप नगरसेविका तथा मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या स्थानिक प्राधिकरण सदस्य सौ. अन्वेषा आचरेकर यांनी दांडी शाळेला विविध प्रकारचे इनडोअर गेम साहित्य तसेच शैक्षणिक साहित्य भेट दिले.
या उपक्रमांतर्गत शाळेला स्टँडसह कॅरम बोर्ड, चेस बोर्ड, लुडो-सापशिडी, इंग्लिश स्पेलिंग किट आदी दर्जेदार इनडोअर गेम साहित्य देण्यात आले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या व इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या बौद्धिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे शाळेच्या शिक्षकवृंदाकडून कौतुक करण्यात आले. शाळेबद्दल असलेली सौ. आचरेकर यांची आस्था आणि सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असल्याचे सांगत शिक्षकांनी त्यांचे आभार मानले.
या प्रसंगी दांडी शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मालंडकर, उपाध्यक्ष धुरी, सर्व शिक्षिका, पालकवर्ग तसेच भाजपच्या नगरसेविका महानंदा खानोलकर, तारका चव्हाण, अमृता फाटक, दीक्षा गावकर, महिमा मयेकर आदी उपस्थित होते.






