सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असताना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज मसुरे येथील प्राचीन भरतगड किल्ल्याची पाहणी केली. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या या किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या कामांची माहिती त्यांनी घेतली.
भरतगडच्या तटबंदीला मजबूत करण्यासाठी याआधी सुमारे १२ कोटी रुपयांचा निधी खर्च करून मोठ्या प्रमाणात काम पूर्ण झाले आहे. मात्र खंदक दुरुस्ती, विहिरीचे पुनर्संचयन आणि काही पूरक कामे अद्याप बाकी असल्याचे पाहणीदरम्यान स्पष्ट झाले. ही सर्व कामे योग्य नियोजनासह आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या दुर्गाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व लक्षात घेता, पर्यटकांना किल्ल्यापर्यंत सहज पोहोचता यावे यासाठीही मंत्री शेलार यांनी विशेष सूचना केल्या. दिशादर्शक फलक, माहिती फलक आणि रस्त्यांची सुधारणा तातडीने करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले.
या पाहणीवेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, शासकीय अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
भरतगड किल्ल्याच्या जतनासाठी सुरू असलेले हे प्रयत्न भविष्यात पर्यटनवृद्धीस नवसंजीवनी देणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







