मुंबई विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन स्पर्धा, २०२४-२५ मध्ये मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने झोन क्र.९ विभागीय पातळीवरील ओव्हरऑल चॅम्पियनशिप पटकावली. मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात झालेल्या समारंभात हा पुरस्कार महाविद्यालयाच्यावतीने आविष्कार समन्वयक प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी स्वीकारला.
मुंबई विद्यापीठाच्या Department of Student Development वतीने दरवर्षी आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, OSD डॉ. मीनाक्षी गुरव, तसेच मार्गदर्शक प्रा. डॉ. सुनीता शैलजन, डॉ. शशिकुमार मेनन आणि डॉ. मनीष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी हजारो विद्यार्थी अभिनव संशोधन प्रकल्प सादर करतात. अनेक प्रकल्पांना स्टार्टअप, उद्योग सहभाग व शासनाकडून प्रोत्साहनही मिळते.
जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत ज्या महाविद्यालयांचे अधिकाधिक प्रकल्प विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी निवडले जातात, त्या महाविद्यालयांना विभागीय स्तरावर चॅम्पियनशिप मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून म्हणजेच झोन क्र. ९ मधून २०२४-२५ या वर्षात तीन महाविद्यालयांनी विभागीय ओव्हरऑल चॅम्पियनशिप मिळवली असून त्यात स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय (मालवण), संत राऊळ महाराज कॉलेज (कुडाळ) आणि आनंदीबाई रावराणे कॉलेज (वैभववाडी) यांचा समावेश आहे.
मुंबई येथील कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी व प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांच्या हस्ते २०२३-२४ आणि २०२५-२६ या दोन्ही शैक्षणिक वर्षांतील आविष्कार स्पर्धेतील झोनल, विद्यापीठ, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय सहभाग, मार्गदर्शक प्राध्यापकांचे सततचे मार्गदर्शन, आविष्कार समितीतील सहकाऱ्यांचे सहकार्य, जिल्हा समन्वयक डॉ. सिरसट व सहसमन्वयक डॉ. उमेश पवार यांचे प्रयत्न, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य शिवराम ठाकूर आणि कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे पाठबळ यामुळे हे यश संपादन करता आले, असे या यशाबाबत बोलताना डॉ. सुमेधा नाईक म्हणाल्या.
या यशाबाबत सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, महाविद्यालय समिती अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर आणि संस्था पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.







