सिंधुदुर्गनगरी, कोकणशक्ती डिजिटल प्रतिनिधी : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतील एकूण ५ हजार ११८ कर्जखात्यांची तपासणी पूर्ण झाली असून, त्यापैकी ४ हजार ८ कर्जखाती पात्र ठरली आहेत. यापैकी ३ हजार ९५६ खात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असल्याची माहिती सहायक निबंधक सुनिल मरभळ यांनी दिली.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासकीय लेखापरीक्षकांमार्फत तपासण्यात आली. तपासणीनंतर पात्र ठरलेल्या कर्जखात्यांची माहिती शासनाने उपलब्ध करून दिलेल्या विशेष पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.
दरम्यान, राष्ट्रीयीकृत, व्यापारी आणि ग्रामीण बँकांमधील कर्जखात्यांची माहिती संबंधित बँकांच्या प्रधान कार्यालयांकडून शासनाच्या पोर्टलवर स्वतंत्रपणे अपलोड करण्यात येत आहे.
बँकांकडून माहिती अपलोड झाल्यानंतर शासनाच्या संगणकीय प्रणालीद्वारे सर्व माहितीची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी पात्र ठरलेल्या कर्जदारांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. ही यादी निबंधक कार्यालय, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था तसेच स्थानिक स्तरावरही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार सेवा सुविधा केंद्रामार्फत ऑनलाइन आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याने पात्र शेतकऱ्यांनी संबंधित सूचनांचे पालन करून आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन सहायक निबंधक सुनिल मरभळ यांनी केले आहे.







