रत्नागिरी – शहरातील बहुतेक रस्त्यांचे काही वर्षांपूर्वी झालेले काँक्रीटीकरण आता खड्डेमय अवस्थेत पोहोचले होते. पावसाळ्यात दुचाकीस्वारांचे अक्षरशः हाल होत होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता तर इतका खराब झाला होता की त्याच्या चिंधड्या उडाल्याचीच चर्चा नागरिकांमध्ये होत होती. सतत तक्रारी, मागण्या, सोशल मीडियावरील पोस्ट… सर्व काही झालं, पण नगर प्रशासन मात्र ‘आम्हा काय त्याचे’ या भूमिकेत असल्याची टीका होत होती.
मात्र, नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू होताच दृश्य पालटू लागले. उमेदवार निश्चित होताच अवघ्या दोन–तीन दिवसांत शहरातील अगदी अंतर्गत रस्त्यांचे रूपडे बदलायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डेमय रस्ते सफाचट करत डांबरीकरण, खोदकामाची दुरुस्ती आणि पॅचवर्क झपाट्याने सुरू झाले आहे.
काही भागांत तर कालपर्यंत खडबडीत दिसणारे रस्ते रातोरात गुळगुळीत झाल्याचे नागरिकांनी आश्चर्याने पाहिले. निवडणूक आली की रस्ते झपाट्याने सुधारतात, याचे यंदा प्रत्यक्ष पडसाद शहरभर उमटले आहेत.
निवडणुकीपुरती का होईना, ही ‘जलद’ सुधारणा वाहनचालकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. तरीही, नियमित देखभाल नसल्याची खंत व्यक्त करत नागरिकांनी निवडणुकीनंतरही हेच काम सुरू राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.







