मालवणमध्ये आज ऐन निवडणूक प्रचार काळात गंभीर घडामोड घडली. मालवणचे आमदार निलेश राणे यांनी रात्री सुमारे सात वाजता मालवण बाजारपेठेतील भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरी अचानक धाड टाकली. आपल्या सहकाऱ्यांसह केलेल्या या कारवाईदरम्यान, एका कॉटवर लाखो रुपयांनी भरलेली बॅग आढळून आली.
आमदार राणे यांनी तत्काळ निवडणूक निर्णय अधिकारी आणि मालवण पोलिसांना घटनास्थळी बोलावले. या संपूर्ण धाडीचे फेसबुक व इंस्टाग्रामवर थेट चित्रीकरण करण्यात आले. राणे यांनी आरोप केला की,
“ही रोखरक्कम मतदारांना वाटण्यासाठीच आणली होती.”
विजय केनवडेकर यांचे स्पष्टीकरण
धाडीदरम्यान भाजपा पदाधिकारी विजय केनवडेकर यांनी ही रक्कम बांधकामासाठी आणली असल्याचा दावा आमदार राणे यांच्या समोर केला.
“भाजपकडून पैसे वाटण्याचा वेग वाढला” — निलेश राणे
धाडीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले :
- “कालपासून भाजपच्या काही कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप सुरू आहे.”
- “आज मी पूर्ण तयारीत होतो. त्यामुळे कार्यकर्त्यांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही.”
- “केनवडेकर यांच्या घरी अंदाजे २० ते २५ लाखांची बॅग सापडली. हे पैसे त्यांच्या घरात काय करत होते?”
आमदार निलेश राणे पुढे म्हणाले की,
“अशा यंत्रणेने रोज बॅगा पोच करण्याचा प्रकार सुरू ठेवून निवडणुका लढवल्या जात आहेत. हे लोक जिंकले तरी पैसे लुटण्याचेच काम करतील आणि शहराला पुन्हा खड्ड्यात टाकतील.”
धाडीनंतरही पोलीस व निवडणूक विभागाने सखोल तपास करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही आमदार निलेश राणे यांनी केली.
मालवण निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकरणामुळे स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.







