मालवण (प्रतिनिधी)
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या नूतनीकृत ‘एकनाथ ठाकूर अध्यक्षीय दालन’चे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात झाले. सोहळ्याचे उदघाटन राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोईर यांनी केले. तर सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहून महाराष्ट्र चेंबरला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा देत शताब्दी वर्ष गाठणे ही अत्यंत अभिमानास्पद व ऐतिहासिक कामगिरी असून उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीत चेंबरचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत संस्थेचे अभिनंदन केले.
या सोहळ्यास राज्याचे गृह (ग्रामीण ), शालेय शिक्षण, सहकार, गृहनिर्माण आणि खाणकाम राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी अध्यक्ष हेमंत राठी, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष संजय सोनवणे, ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण उर्फ दीपक परब, शंकर शिंदे, संगीता पाटील, प्रफुल्ल मालाणी, राज्य मुख्य समन्वयक वेदांशु पाटील, सेक्रेटरी जनरल सुरेश घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ऑनलाईन मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्या “गाव तिथे उद्योजक” या संकल्पनेचे विशेष कौतुक करत प्रत्येक गावातून उद्योजक घडविण्याचा हा उपक्रम राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागात उद्योगनिर्मिती वाढल्यास स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, महाराष्ट्र चेंबरला आवश्यक ती सर्वतोपरी मदत शासन स्तरावरून केली जाईल व शासन ठामपणे पाठिशी उभे राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. पंकज भोईर म्हणाले, उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रात काम करणारे आणि सरकार यांच्यातील महाराष्ट्र चेंबर हा महत्त्वाचा दुवा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात उद्योगाला पोषक वातावरण निर्माण झाले असून विदर्भातील शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक उद्योग निर्मितीत चेंबरने पुढाकार घ्यावा, राज्य सरकारकडून आवश्यक ते सहकार्य देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रमुख पाहुणे महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष व एम्पायर स्पायसेस अँड फूडचे हेमंत राठी म्हणाले, महाराष्ट्र चेंबर मधून एकनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी लाभली. त्यांच्या नावाने दालन उभे राहणे ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष रवींद्र माणगावे म्हणाले, स्व. एकनाथ ठाकूर यांनी उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रात भरीव काम केले. त्यांनी अनेक उद्योजक आणि कार्यकर्ते घडवले. त्यांच्या विचारांच्या पायावरच महाराष्ट्र चेंबरची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर यांनी महाराष्ट्र चेंबरच्या प्रगतीत एकनाथ ठाकूर यांचा मोठा वाटा असून त्यांच्या नावाचे दालन उभे राहणे अभिमानास्पद असल्याचे सांगितले. दरम्यान, या सोहळ्याला कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, महाराष्ट्र चेंबरचे जीसी सदस्य, आणि इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यात महाराष्ट्र चेंबरच्या विविध समित्यांवर नियुक्त झालेल्या पदाधिकारी व सदस्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यात जयेश श्रीकृष्ण परब, सोनाली गुंजाळ, शेखर घोडके, सुजान सिंग कुमरे , दीपाली चांडक, गौरव सोमवंशी, संतोष राणे, मनोज भोसले, किरण भोसले, तेजस्वी राव, शामिका नाडकर्णी, अण्णासाहेब पाटील, विश्वजीत मोटे, रामेश्वर पवार आदींचा समावेश होता.







