“Matsyavani,” India’s first AI-based voice governance platform for fisheries reforms and revenue growth, proposed in a meeting led by Nitesh Rane.
मुंबई, दि. १२ : मत्स्यव्यवसाय प्रशासनात आमूलाग्र सुधारणा, महसूल वृद्धी आणि इंटेलिजन्स प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने “मत्स्यवाणी” – एआय तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिला व्हॉईस गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म राबविण्याचा प्रस्ताव मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला.
मत्स्यव्यवसाय क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक परिणामकारक, जलद आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात येत आहे. “मत्स्यवाणी” प्लॅटफॉर्ममुळे शासकीय यंत्रणा, मच्छीमार व उद्योग यांच्यातील संवाद सुलभ होऊन महसूल वृद्धीसोबतच सशक्त शासकीय प्रणाली प्रस्थापित होईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
बैठकीत मच्छीमार समुदायांसाठी जलसुरक्षा उपाययोजना अंतर्गत पर्यावरणीय जलजनक तंत्रज्ञानाचा (हवेतील आद्रतेपासून जल तयार करणे) पायलट प्रकल्प राबविण्याबाबतही चर्चा झाली. तसेच “महाराष्ट्र एकात्मिक किनारी, सीमा व जिल्हा वैज्ञानिक अंमलबजावणी व सुरक्षा अभियान” या प्रस्तावावर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. तटीय सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक उपायांवरही बैठक झाली.
मंत्री राणे यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्यव्यवसाय क्षेत्रात शाश्वत विकास आणि सागरी सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.या बैठकीस मत्स्यआयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, डवेल लाईफ सायन्स प्रा.लि.चे संचालक वैभव ढसाळ तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.







