रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांचे आवाहन
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जिंकवून देण्यासाठी मतदारांना आवाहन केले.
राऊत म्हणाले की, “रत्नागिरीला टक्केवारीच्या राजकारणापासून दूर ठेवायचे असेल तर नागरिकांनी शिवानी माने यांना भरभरून मतदान करणे अत्यावश्यक आहे.”
त्यांनी टीका करताना सांगितले की, काही लोकांनी घपलेबाजी करून निवडणुका जिंकण्याचा चंग बांधला असून, नगरपालिकेचा वापर ठेकेदारीच्या मार्गाने स्वतःचे पोट भरण्यासाठी केला आहे.
रत्नागिरी ही देवदेवतांची भूमी असून तिचा सांस्कृतिक वारसा जपणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. हा वारसा टिकवायचा असेल तर राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणे अत्यावश्यक आहे.
ते पुढे म्हणाले, “माझा ठाम विश्वास आहे की रत्नागिरी नगर परिषदेतील 32 पैकी 32 उमेदवार महाविकास आघाडीचे विजयी ठरतील. त्या दृष्टीने शिवसेना कार्यकर्त्यांनी येत्या पाच-सहा दिवसांत प्रचंड जोमाने कामाला लागावे.”
राऊत यांनी कार्यकर्त्यांना बूथ लेवलवरील जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडण्याचे निर्देश देत “रत्नागिरी नगर परिषदेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भगवा झेंडा फडकणारच,” असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सोमवारी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या विनायक राऊत यांनी शिवसेना उमेदवार आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. या वेळी शिवसेना उपनेते बाळ माने, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी माने, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, केतन शेट्ये, मिहिर माने यांच्यासह सर्व उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.







