मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निलेश राणे यांनी गेल्या वर्षभरात कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळात मालवण नगरपालिकेत शिवसेनेची सत्ता स्थापन झाल्यास उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांसाठी आवश्यक असणारा निधी कधीही अपुरा पडू देणार नाही, असा ठाम शब्द शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिला.
शिवसेनेच्या उच्चशिक्षित नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ. पूनम नागेश चव्हाण यांच्या प्रभाग ४ मधील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ. ममता वराडकर, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख दीपक पाटकर तसेच अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनानंतर बोलताना दत्ता सामंत यांनी गेल्या वर्षभरात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शहरात झालेल्या विकासकामांचा थोडक्यात आढावा घेतला. प्रभागातील मूलभूत गरजा, रस्ते, स्वच्छता व सुविधा याबाबत पुढील कार्ययोजनाही त्यांनी स्पष्ट केली.
नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ. पूनम चव्हाण यांनी प्रभाग ४ मधील समस्या सोडवण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख सामंत यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने काम करण्याची ग्वाही दिली.
यानंतर सामंत यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रभागात जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या आणि शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात साईराज चव्हाण, सागर गावकर, हर्षदा कारेकर, देवदास गावकर यांसह काही नागरिकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून शिवसेनेच्या प्रचाराला बळ दिले आहे.







