मालवण दि. प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने आयोजित जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यानिमित्त देण्यात येणारा मानाचा ‘आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार’ मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांना शनिवारी प्रदान करण्यात आला. देवगड येथे पार पडलेल्या या मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले.
उमेश नेरूरकर हे गेल्या २५ वर्षांपासून मालवण व्यापारी संघाचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळत आहेत. सन २०००, २००८, २०१६ व २०२४ या चारही जिल्हास्तरीय मेळाव्यांचे यशस्वी आयोजन करून त्यांनी संघटन कौशल्याची ठसा उमटविला आहे. कुशल संघटक म्हणून सर्व व्यापाऱ्यांना सोबत घेऊन काम करून घेण्याची त्यांची हातोटी सर्वपरिचित आहे.
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ मालवणमध्येच नव-युवा महिला व्यापाऱ्यांना संघटनेच्या कामात सक्रियपणे सहभागी करून घेण्याचे अभिनव कार्य त्यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे. व्यापारी वर्षा अभ्यास सहल, व्यापारी एकता वनभोजन, युवा व्यापाऱ्यांची एकदिवसीय एकता सहल, नारळी पौर्णिमा उत्सव, दीपावली उत्सव तसेच विविध स्पर्धा व उपक्रमांचे वर्षभर नियमित आयोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. व्यापारी संघातर्फे सभासद नोंदणी व बैठकींचेही नियमित आयोजन होत असते.
प्रत्येक जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यात मालवणच्या व्यापाऱ्यांची विक्रमी उपस्थिती राहावी यासाठी उमेश नेरूरकर यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कार्याची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने त्यांना ‘आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार’ जाहीर करून गौरविण्यात आले.







