मालवण (प्रतिनिधी):
मालवण शहरातील सागरी महामार्गावर वीज महावितरण कंपनीकडून भूमिगत वीजवाहिनीसाठी खोदलेला चर व्यवस्थित बुजविण्यात न आल्याने परिसरात अपघात घडत होते. या धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधत भाजपचे नगरसेवक ललित चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून अखेर हा चर बुजविण्यात आला.
सागरी महामार्गावर भूमिगत वीजवाहिनीसाठी खोदाई करण्यात आली होती; मात्र कामानंतर चर बुजविला न गेल्याने रस्त्यावर खड्डा पडून वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. या चऱ्यामुळे दोन अपघात घडल्याची नोंदही झाली होती. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन नगरसेवक ललित चव्हाण यांनी वीज महावितरण कंपनीकडे तातडीने कारवाईची मागणी केली होती.
त्यानुसार भूमिगत वीजवाहिनीचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडून खडी व डांबराचा वापर करून चर बुजविण्यात आला. हे काम नगरसेवक ललित चव्हाण यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडले. तसेच याच रस्त्यावरील उर्वरित दोन चरही तात्काळ बुजविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
यावेळी भाजप युवा मोर्चा बूथ अध्यक्ष निनाद बादेकर, संजय खोत, समीर मडये, अजय आळवे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांनी वेळेत दखल घेतल्याबद्दल नगरसेवक चव्हाण यांचे आभार व्यक्त केले.







